ललित कला अकादमीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेन - राम नाईक
By संजय घावरे | Published: January 2, 2024 10:26 PM2024-01-02T22:26:23+5:302024-01-02T22:27:13+5:30
द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उत्तम पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई - दिवंगत शिल्पकार उत्तम पाचारणे यांना नगरसेवक असल्यापासून ओळखत होतो. पाचारणे यांच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. महाराष्ट्रात ललित कला अकादमी सुरू करण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी पाचारणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. उत्तम पाचारणे यांच्या शोकसभेत बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उत्तम पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ चित्रकार वासुदेव कामत, चित्रकार व कला अभ्यासक सुहास बहुळकर, बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उत्तम पाचारणे यांची कन्या सुरुची पाचारणे, जहांगीर आर्ट गॅलरीचे सदस्य तेजस गर्गे, सर जे. जे. आर्ट स्कूलचे गणेश तरतरे, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पल्लवी सबनीस, वरिष्ठ चित्रकार रावसाहेब गुरव, बॅाम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र विचारे, भगवान रामपुरे, प्रा. प्रकाश भिसे, पाचारणे यांचे वडील रोहिदास, पत्नी ज्योती आणि कुटुंबिय उपस्थित होते. उत्तम यांच्या सर्व प्रदर्शनांना भेट द्यायचो असे सांगत म्हणाले की, पाचारणे मागे ठेवून गेलेले वैभव खूप मोलाचे आहे. त्यांनी ९०च्या दशकातील अपघाताची आठवण सांगितली. त्यावेळी उत्तम यांचे वडील रोहिदास यांची भेट झाली. झोपडपट्टीत गेल्यावर उत्तम यांच्या बाबत समजले. उत्तम काम मिळवण्यासाठी माझ्याकडे आले तेव्हा त्यांची पहिली ओळख झाल्याचेही नाईक म्हणाले. बोरीवलीतील स्वामी विवेकानंदांचा पुतळा, स्वातंत्र्य वीर सावरकरांचा पुतळा तसेच स्वातंत्र्य ज्योतीबाबतच्या आठवणी सांगताना पचारणेंचे अनुभव आणि आठवणी संकलित केल्या गेल्यास नवीन कलाकारांना मदत होईल असेही नाईक म्हणाले.
चित्रकार सुहास बहुळकर म्हणाले की, महाराष्ट्रात ललित कला अकादमी व्हावी यासाठी पाचारणे यांनी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली. पुण्यामध्ये ललित कला अकादमी होण्यासाठी २०१९ पासून आजतागायत प्रयत्न सुरू आहेत, पण आजही ते स्वप्न साकार झालेले नाही. महाराष्ट्रात लवकरात लवकर ललित कला अकादमी सुरू करून पाचारणेंचे स्वप्न साकार करायचे आहे. ललित कला अकादमीचे अध्यक्ष असताना त्यांनी १०० हून अधिक उपक्रम राबवत विक्रम केला होता. कुंभमेळा, प्रयाग तसेच राष्ट्रपती भवनात आर्टीस्ट कॅम्प आयोजित घेतला होता. अंदमानात मात्र आर्टिस्ट कॅम्प घेणे शक्य झाले नाही असेही बहुळकर म्हणाले. इतर कलाकार काय काम करतात याची नोंद ठेवणारा आणि घट्ट मैत्री असलेला माझ्या मित्राच्या रूपात उत्तम माणूस गेल्याची भावना व्यक्त करत वासुदेव कामत म्हणाले की, त्यांचे काम वैयक्तीक स्वरूपाचे नव्हते. त्यामुळे घरातील मोठी व्यक्ती गेल्यावर जशी पोरकेपणाची जाणीव होते ती भावना आज माझ्या मनात आहे. त्यांचा बायो डेटा खूप मोठा होता, पण त्यांचे काम त्याहोपेक्षा थोर असल्याने ते चिरंतन राहील असेही कामत म्हणाले.
प्रा. मारूती शेळके यांनी ललित कला अकादमीसाठी काहीतरी करण्यासाठी पाचारणे यांची सुरू असलेली धधपड जवळून पाहिल्याचे सांगितले. ललित कला आकादमीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी आपली निवड करण्यात आल्याचे उत्तम म्हणायचे. अकादमीचा एक तरी उपक्रम महाराष्ट्रात यायला हवा यासाठी त्यांची तळमळ होती असेही शेळके म्हणाले.