Join us

"अयोध्येला जाणार, राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार!" पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 9:36 AM

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

ठळक मुद्देराम मंदिराच्या लढ्यातील शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहेउशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा पण राम मंदिर बनवा, अशी आमची भूमिका होती २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो आणी २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये हा प्रश्न सुटला, ही माझी श्रद्धा आहे

मुंबई - दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईत राम मंदिराच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आता राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. दरम्यान, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाण्यासाठी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत आपले मत मांडताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नुसतं हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं तर मी व्यक्ती म्हणून काहीही उत्तर देऊ शकेन. राम मंदिराच्या लढ्यातील शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नसतानाही अयोध्येला गेलो होतो. योगायोगावर माझी श्रद्धा आहे. २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा राम मंदिरात गेलो होतो. शिवनेरीवरील माती मी घेऊन गेलो होतो. त्यामुळे या विषयाला चालना मिळाली. हा विषय थंड पडला होता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा पण राम मंदिर बनवा, अशी आमची भूमिका होती.

 २०१८ च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो आणी २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये हा प्रश्न सुटला, ही माझी श्रद्धा आहे. कुणाला अंधश्रद्धा म्हणायचं असे तर खुशाल म्हणावं, असे ही ते पुढे म्हणाले. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे.  मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला मानपान सगळं मिळालं. तेही शिवसेनाप्रमुखांचां मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच. आता त मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल. मी व्यवस्थित जाईन. मी पूजाआर्चा करून किंवा कार्यक्रमात सहभाग होऊन परत येईन. पण हे मंदिरी सर्वसामान्य मंदिर नाही. एखाद्या गावातील मंदिर बांधायचं म्हटलं तर गावकरी एकदिलाने एकत्र येतात. त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. ते अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाहीत.

ज्याच्यावर बाबराने आक्रमण करून मशीद बांधली. त्या ठिकाणी आपण पुन्हा मंदिर बांधतोय. राम मंदिर हा केवळ भारतातील हिंदूच नव्हे, तर जागतिक कुतूहलाचा विषय आहे. जागतिक कुतुहलाचा विषय आहे. सध्या कोरोनाचं संकट असल्याने सर्व मंदिरात जाण्यायेण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन. पण लाखो रामभक्त जे अयोध्येत उपस्थित राहू इच्छितात त्यांचं काय करणार, त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का, कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार, नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे ई-भूमीपूजन करू शकता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिर हा भावनेचा विषय आहे. मी मुख्यमंत्री असल्याने तिथे जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल, याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची तिथे उपस्थित राहण्याची इच्छा आहे. त्यांना तुम्ही कसं रोखणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. मी आतापर्यंत तीन वेळा अयोध्येला जाऊन आलो आहे. तिथल्या गाभाऱ्यासमोर उभं राहिल्यानंतर मला जो अनुभव आला तो अदभूत होता. इतरांना तसा अनुभव आला असेलही. मी नाही म्हणत नाही. या विषयावर माझ्याशी कोणी वाद घालू नये किंवा शिकवू नये, असा इशाराही त्यांनी दिला.  

टॅग्स :उद्धव ठाकरेअयोध्याराम मंदिरशिवसेनाराजकारण