Join us

जूनअखेरीस गो फर्स्ट पुन्हा घेणार टेकऑफ? कंपनीकडून डीजीसीएला प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 06:44 IST

कंपनीच्या ताफ्यात असलेल्या एकूण ५२ विमानांपैकी २६ विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या २ मेपासून जमिनीवर स्थिरावलेली गो फर्स्ट कंपनी पुन्हा एकदा उड्डाणासाठी प्रयत्नशील असून जून अखेरीपर्यंत २२ विमानांच्या माध्यमातून उड्डाण करण्यासाठी आता कंपनीने प्रयत्न सुरू केल्याचे समजते. यासंदर्भात कंपनीने यापूर्वीच डीजीसीएकडे पुनर्नियोजन आराखडा सादर केला आहे. हा आराखडा प्राप्त झाल्यानंतर आता डीजीसीएने कंपनीला त्यांच्या कर्जदारांसोबत चर्चा करून आर्थिक नियोजनासंदर्भात विचारणा करण्यास सांगितले असले तरी समांतर पातळीवर कंपनीने देखील आपल्या ताफ्याची तपासणी सुरू केल्याचे वृत्त आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या ताफ्यात असलेल्या एकूण ५२ विमानांपैकी २६ विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवर आहेत. तर, उर्वरित २६ विमाने उड्डाणासाठी योग्य आहेत. मात्र, कंपनीने  दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर कंपनीच्या ताफ्यातील १८० वैमानिकांनी कंपनी सोडली. त्यामुळे तूर्तास कंपनीकडे ५०० वैमानिक आहेत. डीजीसीएची अनुमती मिळाली तर तातडीने विमान सेवा सुरू करण्यासाठी एवढी वैमानिक संख्या पुरेशी असल्याचे मानले जात आहे. तसेच, अनुमती मिळाल्यानंतर वाराणसी, पटणा, लखनौ, रांची अशा कमी नफा असलेल्या मार्गांवर सुरुवातीच्या टप्प्यात तरी कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्याऐवजी जास्त नफा देणाऱ्या दिल्ली, श्रीनगर, लेह या मार्गांवर अधिक फेऱ्या करण्याचे नियोजन कंपनीने केल्याचे समजते. दरम्यान, कंपनीच्या विमानांचे “उड्डाण बंद होण्यापूर्वी कंपनी दिवसाकाठी देशातील विविध मार्गांवर एकूण २०० फेऱ्या करत होती व त्या माध्यमातून ३५ हजार प्रवाशांची ने-आण करत होती.

टॅग्स :विमान