लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): मी कोणताही गुन्हा केलेला नसून माझ्याकडून झालेली चूक नकळत आहे. केवळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून मला कोणी झुकवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही. त्यासाठी मला तुरुंगात टाकले तरी चालेल, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवले आहे. उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली होती.
अंधारे यांनी लिहिले संस्कृत भाषेतून पत्र
अंधारेंनी येत्या आठ दिवसांत दिलगिरी पत्र दिले नाही, तर हक्कभंगासाठी परवानगी देऊ, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून अंधारे यांनी संस्कृत भाषेतून पत्र लिहिले आहे. मला उपसभापतींकडून यासंदर्भात कुठलेही लेखी पत्र आलेले नाही. पण, विषाची परीक्षा कशाला म्हणून मीच त्यांना पत्र लिहिले आहे, असे सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.