मुंबई - राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार खलबते झाली आहे. दरम्यान, दुपारी चार वाजता भाजपाची पुन्हा एकदा बैठक होणार असून, सत्तास्थापनेच्या निर्णयाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ''माननीय राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी भाजपाला निमंत्रित केले आहे. या निमंत्रणाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता संध्याकाळी चार वाजता आम्ही पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. त्यानंतर सरकार स्थापन करणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय आम्ही राज्यपालांना कळवणार आहोत,''
विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र निकालांनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेतली. पण भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती देण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने अधिकच ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे 13 व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतरही नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे.