Join us

'एसटी महामंडळातील 2 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का?'

By महेश गलांडे | Published: November 09, 2020 4:07 PM

मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले.

ठळक मुद्देचौधरी यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला प्रश्न केले आहेत.

मुंबई - एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच, या मृत्युची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी भाऊ, पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चौधरी यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला प्रश्न केले आहेत. ''वेतन न मिळाल्याने 2 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या,या अतिशय वेदनादायी,मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. 

गिरीश महाजनांचीही टीका

मनोज चौधरी हे गेल्या 10 वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचं असून कुठल्याच संवेदना या सरकारला नाहीत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, 4-4 महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतकऱ्यांना सांगितलं की दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही, असे म्हणत माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. मराठा समाजातील आंदोलक कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री भेटायला तयार नाहीत. तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. असं सरकार चाललंय. राज्यातील सर्वच वर्गात तीव्र नाराजी असून सरकार कोण चालवतंय, कुणाचंय काहीच समाजायला मार्ग नाही. आज, एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीमागं आहे, घरातील कमावता माणूस निघून गेल्यानं मोठं संकट कुटुंबीयांवर कोसळलंय. मात्र, सरकारला जाग येत नाही, कुणीही या पीडित कुटुंबीयांना भेटायला तयार नाही, सरकार संवेदनाहीन झालंय, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसआत्महत्याबसचालकमुंबई