मुंबई : मुंबईकरांनाम्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी वाट पाहावी लागणार आहे. मुंबईमध्ये जागेची कमतरता असल्याने म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी काढण्यात येणारी लॉटरी या वर्षी होणार नाही. म्हाडाची परवडणारी घरे घेण्यासाठी आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाची मुंबईमध्ये लॅण्डबँक नसल्याने नव्याने प्रकल्प सुरू होऊ शकत नाही. मात्र यंदा हजार घरांची तरी लॉटरी काढता येईल का, याबाबत घरांची चाचपणी सुरू असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांनी दिली.
म्हाडा पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळेस म्हाडा इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते. ते म्हणाले की, मुंबई मंडळाची सोडत निघणार नसली तरी कोकण मंडळाने ९,२०० घरांची लॉटरी या आठवड्यामध्ये काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही घरे ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमधील असतील. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हजार घरे तयार करण्यात येत असून त्यासाठी घरांची चाचपणी सुरू आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. परंतु या घरांची लॉटरी काढण्यासाठी एक वर्षही लागू शकते.
म्हाडामार्फत पहाडी गोरेगावमधील पाच हजार घरे आणि धारावीमध्ये ६०० घरे बनवण्यात येत आहेत. यातील १२०० घरांचा या वर्षीच्या लॉटरीमध्ये समावेश करता येईल का, याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. तर म्हाडाच्या दुरुस्ती मंडळांच्या कामांचा आढावा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असून म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी वित्त संस्थांकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे आश्वासन दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिले आहे. तर सध्या शासनाकडून जुन्या उपकरप्राप्त इमारती आणि पंतप्रधान आवास योजना प्रकल्पांसाठी विशेष लक्ष देण्यात येत असून पीएमजीपीच्या ६६ इमारती लवकर विकसित होतील, असेही घोसाळकर यांनी सांगितले.
म्हाडाच्या सकारात्मक बातम्यांचा राज्यातील ओघ हा वाढत असून या साºयाचे श्रेय म्हाडा वार्तांकन करणाºया पत्रकारांना जात असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. तर संघर्षातून सर्वसामान्यांचे दृष्टिकोन मांडणारी पत्रकारिता हेच पत्रकारांचे सामर्थ्य आहे, अशी भावना मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी या वेळेस मांडले. नागपूर मंडळाचे मुख्याधिकारी आडे यांनी आपल्या काव्यपंक्तीतून पत्रकारितेच्या तेजाचे महत्त्व पटवून दिले.