लोककल्याणासाठी आठवले राजीनामा देतील का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:05 AM2019-01-19T06:05:51+5:302019-01-19T06:06:02+5:30
श्रीपाल सबनीस : भाजपा कल्याणकारी नाही
डोंबिवली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी राजकीय दबावापोटी हिंदू कोडबिल मंजूर केले नव्हते. तसेच ओबीसी आयोगाची स्थापना केली नव्हती. हिंदू कोडबिलप्रकरणी तत्कालीन कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आताचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले राजकीय स्वार्थासाठी भाजपामध्ये गेले आहेत. भाजपा सरकार लोकांचे कल्याण करू शकत नाही. या सरकारविरोधात आठवले मंत्रीपदाचा राजीनामा देतील का, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी येथे केला.
प्रा. शुक्राचार्य गायकवाड लिखित ‘मानवाचं कल्याण संविधान’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आंबेडकर सभागृहात सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, संविधानाची मांडणी अत्यंत किचकट आहे. ते सध्याचे राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना समजले आहे. ते त्यांनी कधी वाचले आहे का? वाचन तर दूरची गोष्ट आहे, किमान चाळून पाहिले आहे का, असा सवाल त्यांनी केला. ‘मानवाचं कल्याण संविधान’ हे नाटक खरोखरच चांगले असल्याचे ते म्हणाले.