मुंबई- अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीवरुन आता शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप आणि शिंद गटांत सामना रंगला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवार ऋुतुजा लटके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा धुरळा जरी उडाला असला तरी भाजपा आणि ठाकरे गटाने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. मात्र याचदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला होता. आता, आमदार आदित्य ठाकरे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलंय.
अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपासाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात याकडे सर्वांतं लक्ष आहे. त्यातच, नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर बोचरी टिका केली. त्यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई गेली. आता दक्षिण मुंबईतही भाजपाचाच खासदार जिंकून येणार असं नारायण राणे यांनी म्हटलं. तसेच दिवगंत रमेश लटके आज असते, तर ते शिंदे गटात असते, असं विधानही राणेंनी केलं. हिंमत असेल तर सरकार पडून दाखवा, असे म्हणत होते. अखेर आम्ही सरकार पाडून दाखवलं, असे राणेंनी म्हटलं होतं. यासंदर्भात आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आदित्य ठाकरेंनीही राणेंवर थेट प्रहार केलाय.
''पुढचा खासदार निवडून येईपर्यंत नारायण राणे स्वतः भाजपमध्ये राहतील की नाही हाच प्रश्न आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून हा त्यांचा आतापर्यंतचा चौथा पक्ष आहे. प्रत्येकवेळी आमच्याबद्दल वाईट बोलायचं, हेच त्यांचे काम. त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आम्ही कामांवर लक्ष देतो,'' असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते शनिवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजप उमेदवाराला विजयाचा विश्वास
दरम्यान, भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असं सांगत मुरजी पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.