Join us

हुक्क्याची हुक्की थांबेल का ? नेमके प्रकरण काय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 9:49 AM

बारच्या एका कोपऱ्यात मंद उजेडात सोफ्यावर ऐटीत पसरून तब्येतीत हुक्का ओढणे ही फॅशन झाली आहे.

रवींद्र राऊळ

बारच्या एका कोपऱ्यात मंद उजेडात सोफ्यावर ऐटीत पसरून तब्येतीत हुक्का ओढणे ही फॅशन झाली आहे. तरुण पोरं याकडे जास्त आकृष्ट होतात. या धंद्यात पैसा जास्त म्हणून अनेक रेस्टॉरंट्सनी हुक्का पार्लर सुरू केले. मात्र, त्यास वेसण घातली गेली. हायकोर्टाने अलीकडेच एका रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. हे एका अर्थी बरेच झाले...

गधगते निखारे आणि अल्कोहोलयुक्त दारू असे ज्वालाग्राही पदार्थ एकाच टेबलावर ठेवत चालणाऱ्या हॉटेल-रेस्टाॅरंटमधील हुक्का पार्लरच्या खतरनाक खेळाला हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे पूर्णविराम मिळेल काय? असा सवाल सध्या विचारला जात आहे. महापालिकेच्या नियमांना शिताफीने बगल देत  गेली अनेक वर्षे खाद्यगृहांमध्ये हा हुक्का पार्लरचा धोकादायक धंदा सुरू होता.    युवा पिढीला वाममार्गावर नेणाऱ्या हुक्का पार्लरबाबत वेळोवेळी वादंग उठतात, पण एखाद दुसऱ्या हुक्का पार्लरवर कारवाई झाली की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू होतात, असा मुंबईकरांचा अनुभव आहे. गेल्या पंधरा - वीस वर्षांत हुक्का पार्लरचा प्रचंड सुळसुळाट झाला. चार वर्षांपूर्वी याबाबत खूपच ओरड झाल्यावर राज्य सरकारने तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी आणली. मात्र एका हुक्का पार्लर चालकाने यावर शक्कल लढवत हायकोर्टात धाव घेतली. तेथे त्याने आपण तंबाखूजन्य नव्हे तर हर्बल हुक्का देतो, असा दावा केला. हा हर्बल हुक्का शरीराला अपायकारक नसतो, असेही त्याने कोर्टासमोर मांडले. त्यावर न्यायालयाने हर्बल हुक्का पार्लरांना परवानगी दिली. मात्र ती सेवा कुठे, कशी द्यायची याबाबत काहीच स्पष्टता नव्हती.

  हर्बल हुक्क्याला परवानगी असल्याचे पाहून शहरातील शेकडो हॉटेल आणि रेस्टाॅरंटचालक सुखावले आणि त्यांनीही हर्बल हुक्का पार्लर सुरू केले. खरी गोम अशी होती की बहुतांश ठिकाणी हर्बल हुक्का चालत असल्याचा दावा करीत प्रत्यक्षात मात्र तंबाखूचा हुक्का दिला जातो.

बेकायदा हुक्का पार्लरचालकांना महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांचीही साथ असल्याचा आरोप कायमच होत असतो. सायंकाळी सहानंतर महापालिका कार्यालये बंद होत असल्याने त्यापुढची कारवाई कोणी करायची, असा प्रश्न असतो. हुक्का पार्लर सायंकाळनंतर सुरू होत असल्याने महापालिकेच्या कारवाईला मर्यादा येतात. याचाही गैरफायदा घेतला जातो. हुक्का तंबाखूचा असो की हर्बलचा, त्यासाठी निखारे वापरले जातात आणि त्यासाठी अग्निशमन दलाची परवानगी आवश्यक असते. स्मोकिंग झोनचे नियमही पायदळी तुडविले जातात. सोनाराने कान टोचले आहेत. यापासून धडा घेत महापालिका कितपत कठोर धोरण अवलंबते ते दिसेलच.

 सात महिन्यांपूर्वी हा विषय ऐरणीवर आला तो चेंबूर येथील ऑरेंज मिंट या बारमध्ये असा बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर चालत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरीयाल यांच्या निदर्शनास आले तेव्हा.

 स्मोकिंग झोनचे प्रमाणपत्र न घेता चालत असलेल्या या हुक्का पार्लरबाबत त्यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केली. त्यावर महापालिकेने या बारला नोटिसा देत परवाना का रद्द करू नये, अशी विचारणा बारमालकाला केली.

 त्यावर बार मालकाने परवानगीसाठी हायकोर्टात धाव घेतली. या हुक्का पार्लरमुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने बारमध्ये येणाऱ्या महिला, वृद्ध, मुले यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हणत सात दिवसांत बार बंद करण्याची नोटीस महापालिकेने दिली.

  त्यामुळे बारमालकाने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आणि त्यावर खाद्यगृहात खाद्यसेवेशिवाय इतर कोणत्याही कारवाया करता येणार नाही, असे स्पष्ट केले.