Join us

पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांशी संवाद वाढविणार - चंद्रशेखर जयस्वाल

By स्नेहा मोरे | Published: February 09, 2024 7:14 PM

देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी महत्त्वाची भूमिका बजावेल.

मुंबई: देशांतर्गत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद वाढवण्यासाठी ‘ओटीएम’ प्रदर्शनी महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ४० उद्योजक या ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी झाले आहेत, पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी विविध स्तरातील घटकांशी संवाद वाढविणार असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर तीन दिवस आऊट बाऊंड ट्रॅव्हल मार्ट (ओ. टी. एम.) मार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन करताना जयस्वाल बोलत होते. यावेळी पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे उपस्थित होते. या कार्यक्रमात कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले अशा महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळ आणि समृद्ध वारासंघाची ओळख जगभरात पोहचविणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दालन सध्या जगभरातील आकर्षण बनले आहे.

जयस्वाल म्हणाले , या प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट, विविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतील, इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल. राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल. कॉन्क्लेव्ह, रोड शो आणि ट्रेड मेळावे अशा कार्यक्रमांची मालिका करण्यावर महाराष्ट्र टुरिझमचा भर आहे. याचा भाग म्हणून पर्यटन विभाग देशभरातील विविध प्रमुख पर्यटन व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होत आहे.

टॅग्स :मुंबईपर्यटन