Join us  

तैवानबरोबर तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 5:21 AM

तैवान एक्स्पोचे मुंबईत उद्घाटन

मुंबई : उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आणि तैवानमध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ९० कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.

गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित ‘तैवान एक्स्पो २०२३ इंडिया’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी तैवान एक्स्टर्नल डेव्हलपमेंट कौन्सिल (ताईत्रा)चे अध्यक्ष जेम्स हुआंग, राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर, मुंबईचे महासंचालक होमर च्यांग आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस आहे. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा १५ टक्के वाटा आहे.

या प्रदर्शनाच्या उदघाटनाला देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित राहिले ही आमच्यासाठी अतिशय मोठी गोष्ट असून, आमच्या तंत्रज्ञानाची व उपक्रमांची माहिती त्यांना सादर करता आली, याबद्दल आम्ही विशेष आनंदी आहोत. महाराष्ट्र आणि तैवान या दोघांत तंत्रज्ञानाच्या पातळीवर काम करण्याची आमची इच्छा असून त्या दृष्टीने आम्ही आता कार्यरत झालो आहोत.

- जेम्स हुआंग, अध्यक्ष, ताईत्रा

 महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल असून राज्यात १७ हजार नोंदणीकृत स्टार्टअप आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. डेटा सेंटरची क्षमता सातत्याने वाढत आहे. परकीय थेट गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर असून २०२८ पर्यंत राज्याचे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट आहे.

 महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणूकदारांना येथे प्रोत्साहन दिले जात असून, शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. तैवान हा उद्योग आणि व्यापार क्षेत्रात महाराष्ट्राबरोबर विश्वासू भागीदार बनू शकतो, असे सांगून तैवानच्या उद्योजकांचे त्यांनी राज्यात स्वागत असल्याचे सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस