स्वप्नातले घर होणार का? विटा स्वस्त, वाळू महाग; खरेदीदारांपुढे उभा ठाकला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:05 PM2023-03-21T13:05:42+5:302023-03-21T13:05:59+5:30
आता बांधकामाचे दिवस आहेत. मात्र, भाववाढीमुळे स्वप्नातले घर बांधायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई : दोन वर्षांपूर्वी गगनाला भिडलेले बांधकाम साहित्यांचे दर मार्च २०२३ मध्येसुद्धा वाढलेले आहेत. आजही अनेक ठिकाणी बाजारात वाळूच मिळत नाही. गुजरात वाळूसाठी महिना महिना वाट पाहावी लागत आहे. आता बांधकामाचे दिवस आहेत. मात्र, भाववाढीमुळे स्वप्नातले घर बांधायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोरोना काळात लोकांनी वेळ असल्याने घराची बांधकामे काढली होती. तेव्हा भाव प्रचंड वाढले होते. आता जरी काही साहित्याचे भाव कमी झाले. बांधकामाचा सिझन आहे. त्यामुळे साहित्य महागच असल्याचे बांधकाम साहित्य विक्रेते सुजितकुमार यांचे म्हणणे आहे.
बाजारात वाळू लगेच मिळत नाही. इतरही साहित्य महाग आहे. त्यात लोकांना घर बांधायचे आहेत. पण महागाईमुळे छोटी छोटी बांधकाम लोक करत आहेत असे कंत्राटदार विनोद गुप्ता यांनी सांगितले.
जोगेश्वरीत राहणाऱ्या कल्पना जाधव यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांना हवी तशी वाळू मिळत नाही. चालू वाळूने बांधकाम केले जात आहे. तर मनोहर पांडे यांचे चाळीतले जुने घर डबल करायचे आहे. मात्र अनुभवी आणि स्वस्त कडिया मिळत नसल्यामुळे काम थांबले आहे.
रेतीचे भाव गगनाला
घर, बंगला किंवा फार्म हाऊस बांधताना अनेकांना गुजरातची वाळू हवी असते. शिवाय चांगल्या दर्जाची वाळू हवी असते. मात्र, कंत्राटदाराकडून हवी तेव्हा वाळू मिळत नसल्याने अनेक बांधकामे रेंगाळलेली आहेत. बांधकामात घाई केल्यास वाळूत भेसळ होण्याची किंवा ओली वाळू वापरली जाण्याची भीती असते. रेतीवर असलेल्या निर्बंधामुळे बाजारात गुजरात रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. चालू रेतीचा भावही साठ रुपये गोणी सुरू आहे.
सिमेंटचे दर ‘जैसे थे’
सिमेंटचा दर वाढलेलाच आहे. कुठे ४८०, तर कुठे ४२० रुपये गोणी. उत्तम दर्जाचे सिमेंट विकले जात आहे. कधी चालू सिमेंट जास्त वापरले जात आहे.
खडीही महागली
अनेक ठिकाणी खडी उत्खनन बंद आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या दर्जाची खडी मिळायला वेळ लागतो. मागणी वाढल्यामुळे खडीनेही भाव खाल्ला आहे.
मातीच्या विटा महाग, सिमेंटच्या ‘जैसे थे’
सिमेंटचा दर ४६० वरून खाली आलेला नाही. मात्र, मधल्या काळात मोठ्या प्रमाणात विटांची निर्मिती झाली आहे. बाजारात उत्तम दर्जाची वीट सहा रुपयांपासून उपलब्ध आहे.
स्टील ३ हजारांनी स्वस्त
- सप्टेंबर २०२२ मध्ये स्टीलचा दर ९८०० होता. त्याचा मोठा परिणाम बांधकामावर होत होता. आता दर २ ते ३ हजारांनी कमी आहे. मात्र तरीही बांधकामाला वेग नाही.