Join us

मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवरून भाजप आणि शिंदेसेनेत जुंपणार

By मनोहर कुंभेजकर | Published: August 01, 2024 7:16 PM

Maharashtra Assembly Election 2024: येत्या ऑक्टोबर मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.मात्र या जागेवरून भाजप- शिंदे सेनेत जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - येत्या ऑक्टोबर मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे.यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.मात्र या जागेवरून भाजप- शिंदे सेनेत जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षावर नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला. शिंदे सेनेकडून या मतदार संघाची तयारी सुरू केली आहे.अंधेरी पूर्वची जागा शिंदे सेनेची असून येथून स्वीकृती शर्मा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमित साटम यांनी अंधेरी पूर्वची जागा भाजपच लढणार आणि जिंकणारच असून येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली.त्यामुळे या जागेवरून भाजप व शिंदे सेनेत वाद होण्याची शक्यता आहे.

मतदार संघात काका या नावाने ओळखले जाणारे मुरजी पटेल यांनी सुद्धा त्यांचे लक्ष आगामी विधानसभा  निवडणूकीवर केंद्रीत केले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे मानले जातात.

उद्धव सेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या  निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतली होती. या मतदार संघात ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या ६६,५३० मतांनीनिवडून आल्या होत्या. या मतदार संघात गेली १५ वर्षे असलेला आपला गड राखण्यासाठी उद्धव सेनेने  जोरदार तयारी सुरू केली आहे.आमदार ऋतुजा लटके यांना येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परत  निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार का किंवा नवा चेहरा म्हणून उद्धव सेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत यांना उमेदवारी देणार का अशी मतदार संघात चर्चा आहे.

त्यामुळे अंधेरी पूर्वची जागा भाजप का शिंदे सेना लढणार, कोण या मतदार संघात तिकीटासाठी बाजी मारणारयाकडे सत्ताधारी व विराधकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :अंधेरी पूर्वमुंबईभाजपाएकनाथ शिंदे