मनीषा म्हात्रे
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय), व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण (५२) यांच्या स्वेच्छानिवृत्तीचे गूढ कायम असताना, ते हैदराबादमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्या दिशेने त्यांचे हैदराबादचे दौरेही सुरूझाले आहेत. सोमवारीच ते हैदराबादवरून मुंबईत आले.मात्र स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारल्यानंतर पुढील वाटचालीबाबत सांगणार असल्याचे लक्ष्मीनारायण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले लक्ष्मीनारायण १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास लक्ष्मीनारायण यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केल्यानंतर पोलीस दलात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. ते २०२५ मध्ये निवृत्त होणार असताना, त्यापूर्वीच घेतलेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आले. पण याचदरम्यान ते हैदराबादमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.नांदेड पोलीस अधीक्षक, राज्य दहशतवादविरोधी पथकामध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांची १२ जून २०१६ रोजी हैदराबाद येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेथे त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे ते युवकांचे ’हीरो’ ठरले. लीड इंडिया फाउंडेशनच्या हैदराबाद येथील सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी १५ लाखांपेक्षा जास्त युवकांशी संवाद साधला. लीड इंडिया फाउंडेशनची सुरुवात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आशीर्वादाने झाली.हैदराबादमध्ये त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते सर्वांच्याच जवळचे आहेत. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा पुढाकार आहे. आतापर्यंत ५४ वेळा त्यांनी रक्तदान केले. यासाठी शासनाकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला. त्यांनी तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेतले. गावकरी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने हे गावही चांगल्या पद्धतीने विकसित केले.