‘विधि’ला प्रवेश मिळणार का? मुंबई विद्यापीठ; विद्यार्थ्यांना अद्याप दिलासा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:31 AM2017-08-08T04:31:43+5:302017-08-08T04:31:43+5:30
आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही निकाल जाहीर करण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई विद्यापीठामुळे, राज्यभरातील विधि अभ्यासक्रम प्रक्रिया पुढे ढकलली होती, पण ९ आॅगस्टला विधि प्रवेशाची पहिली यादी लागणार असल्यामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठातून पदवी परीक्षेसाठी बसलेले लाखो विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही निकाल जाहीर करण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई विद्यापीठामुळे, राज्यभरातील विधि अभ्यासक्रम प्रक्रिया पुढे ढकलली होती, पण ९ आॅगस्टला विधि प्रवेशाची पहिली यादी लागणार असल्यामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होणार नाही, याची कल्पना आल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मागितली होती. तंत्रशिक्षण संचालनालायतर्फे ७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ९ आॅगस्टला विधि अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर होणार आहे, तरीही मुंबई विद्यापीठाचे लाखो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेतच आहेत.
संचालनालयातर्फे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार,
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरलेला आहे, पण पहिला अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाचे गुण हे अंदाजे अथवा ४५ टक्के इतके भरले आहेत. हे चुकीचे गुण भरले असल्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून विद्यापीठाने काहीतरी पावले उचलावीत, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे.
एलएलएम सीईटीचे निकाल जाहीर
शुक्रवारी सायंकाळी एलएलएम अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेला २ हजार ८०० विद्यार्थी बसले होते, पण
अद्याप मुंबई विद्यापीठाने एलएलबीचा निकाल
जाहीर केलेला नाही. त्यामुळे एलएलएम सीईटीचा
निकाल जाहीर झाला असला, तरीही विद्यार्थी प्रवेश कसा घेणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.