विलास तरे मंत्री?
By admin | Published: October 22, 2014 12:45 AM2014-10-22T00:45:46+5:302014-10-22T00:45:46+5:30
बविआच्या तीन आमदारांपैकी नालासोपाऱ्याहून क्षितीज ठाकूर दुसऱ्यांदा तर बविआचे सूत्रधार हितेंद्र ठाकूर पाचव्यांदा निवडून आले आहेत.
वसई : राज्यामध्ये स्थापन होऊ घातलेल्या आपल्या सरकारला पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपच्या दूतांनी बहुजन विकास आघाडीचे सूत्रधार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याने व हा पाठिंबा देण्यास त्यांनी अनुकूलता दर्शविल्यामुळे आता बविआच्या तीन आमदारांपैकी कोणाला मंत्रीपद मिळेल या चर्चेला जोर चढला असून, बविआच्या अंतस्थ सूत्रानुसार ज्येष्ठ आमदार व आदिवासींचे प्रतिनिधी असलेले विलास तरे यांना मंत्रीपद मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
बविआच्या तीन आमदारांपैकी नालासोपाऱ्याहून क्षितीज ठाकूर दुसऱ्यांदा तर बविआचे सूत्रधार हितेंद्र ठाकूर पाचव्यांदा निवडून आले आहेत. परंतु गेली पाच वर्षे त्यांनी ड्रॉप घेतला होता. तर तरे हे बोईसरमधून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. आमदारकीच्या ज्येष्ठतेनुसार हितेंद्र आघाडीवर असले तरी राजकीय व्यूहरचनेचा भाग म्हणून तरेंना ते संधी देतील, अशी चिन्हे आहेत. कारण डहाणू, पालघर, विक्रमगड या तीन मतदारसंघात बविआला आपले स्थान मजबूत करायचे आहे. या तीनही मतदारसंघात आदिवासी मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे तरेंना मंत्रीपदाची संधी दिल्यास त्यातून योग्य तो मेसेज आदिवासी मतदारांपर्यंत पोहचेल व त्यातून बविआचे राजकीय बस्तान डहाणू, पालघर, विक्रमगड येथे मजबूत होईल, अशी ही खेळी आहे. एकीकडे बडे राजकीय पक्ष ढासळत असताना जर संपूर्ण पालघर जिल्हा बविआच्या वर्चस्वाखाली आता तर तो अलीकडच्या राजकारणातला चमत्कार ठरणार आहे. व तो घडविण्याच्या खेळीचा एक भाग म्हणून नव्या सरकारमध्ये तरेंना मंत्रीपद मिळू शकते.