महापौर होणार ‘आउट आॅफ रिच?’
By admin | Published: April 19, 2017 01:12 AM2017-04-19T01:12:18+5:302017-04-19T01:12:18+5:30
दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौर निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेत हलविण्यात येणार आहे
मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौर निवासस्थान भायखळा येथील राणीच्या बागेत हलविण्यात येणार आहे. मात्र विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या प्रस्तावाचा विरोध करत अतिरिक्त आयुक्तांच्या मलबार हिल येथील बंगल्यात महापौरांचे निवासस्थान उभारण्याची मागणी केली आहे. मात्र मलबार हिलमध्ये उच्चभ्रू वस्ती असल्याने तसेच ते वाहतुकीच्या दृष्टीनेही सोयीचे नसल्याने महापौर सर्वसामान्यांच्या ‘आउट आॅफ रिच’ जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापौर निवासस्थानाबाबत निर्णय होईपर्यंत महापौर महाडेश्वर यांना समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या दादर येथील प्रशस्त महापौर बंगल्यात काही काळ मुक्काम करता आला आहे. मात्र येथे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महापौरांना राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव असलेला बंगला देण्यात येणार आहे. परंतु या प्रस्तावाला शिवसेना नेत्यांनी पूर्वीपासूनच नकारघंटा वाजवली आहे. त्यानुसार विद्यमान महापौरांनीही तीच री ओढली आहे. महापौर बंगल्याची शान व गरीमेला साजेसा बंगला देण्याचा तगादा महापौरांनी प्रशासनाकडे लावला आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) यांचे निवासस्थान असलेले बंगले महापौर निवासस्थानासाठी देण्याची मागणी महाडेश्वर यांनी केली आहे. मलबार हिल येथे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांसाठी राखीव दोनच बंगले आहेत. या बंगल्यांवरच महापौरांनी दावा केला आहे. मात्र महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना भेटण्यासाठी दररोज शेकडो नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने हा बंगला गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे महापौरांची ही मागणी मान्य झाल्यास नागरिकांना त्यांच्या भेठीगाठी घेणे दुर्लभ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)