Join us

मेंडोन्सा शिंदेगटात सहभागी होणार? माजी आमदाराने बॅनर लावून केलं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 11:13 PM

एकेकाळी शहरात मेंडोन्सा यांचे एकछत्री वर्चस्व होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकी पूर्वी त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता

मीरारोड - मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा व त्यांची शिवसेना नगरसेविका असलेली मुलगी माजी महापौर कॅटलीन परेरा यांनी जाहीर फलक लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याने शहरातील मेंडोन्सा समर्थक शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी देखील सेनेपासून फारकत घेण्याची शक्यता आहे. तर, मेंडोन्सा हे शिंदेगटात सामिल होतील, अशी चर्चाही रंगली आहे. 

एकेकाळी शहरात मेंडोन्सा यांचे एकछत्री वर्चस्व होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकी पूर्वी त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. परंतु काही काळा नंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयवरून शिवसेनेचा फलक काढून केवळ व्यक्तिगत नावाचा फलक लावला. नंतर ते प्रकृतीच्या कारणाने सक्रिय राजकारणातून दूर असले तरी त्यांना मानणारा वर्ग शहरात आहे. मध्यंतरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात परतण्याचे जाहीर आव्हान केले होते. परंतु त्यांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे ते शिवसेने सोबत कायम असल्याचे मानले जात होते . 

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदारांना एकत्र करून बंडखोरी करत भाजपा सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पद मिळवले आहे. सेनेतील फूट रोखण्यासाठी मातोश्री वर उद्धव ठाकरे यांनी शहरातील सेने नगरसेवक , पदाधिकारी आदींशी चर्चा करत नंतर शहरात सेनेची जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे . मातोश्री वरील चर्चेत स्वतः ठाकरे यांनी मेंडोन्सा यांच्या बद्दल विचारणा केल्याची चर्चा होती . 

परंतु मुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा देणारे जाहीर फलक मेंडोन्सा आणि त्यांची नगरसेविका कन्या कॅटलीन यांचे लागल्याने मेंडोन्सा हे शिंदे सोबत जाणार अशी चिन्हे आहेत . उत्तन भागात मेंडोन्सा यांचे समर्थक सेनेचे नगरसेवक आहेत . शिवाय सेनेचे अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक सुद्धा मेंडोन्सा समर्थक मानले जातात . त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ मेंडोन्सा यांनी देखील शिंदे यांचा मार्ग धरल्यास सेनेला फटका बसणार अशी चिन्हे आहेत . शिवाय अपक्ष आमदार गीता जैन ह्या देखील सेनेची साथ सोडून स्वगृही भाजपा कडे परतल्या असल्याने शहरात शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या हाती शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी असणार आहे.   

टॅग्स :एकनाथ शिंदेमीरा रोडमुंबईशिवसेना