- अजय परचुरेमुंबई - मुंबईतील १,३८४ घरांसाठीम्हाडाने नुकतीच लॉटरी जाहीर केली. परवडणारी घरे म्हणून मुंबईकर दरवर्षी मोठ्या अपेक्षेने या लॉटरीची वाट पाहातात. मात्र, या लॉटरीतील उच्च उत्पन्न गटातील ग्रँटरोड येथील ३ घरांची किंमत ऐकून तोंडाला फेस येण्याची वेळ आली आहे. ग्रँटरोडमधील उच्च उत्पन्न गटातील एका घराची किंमत ५ कोटी ८० लाख आहे. गेल्याच वर्षी घरांच्या किमती जास्त असल्याने, लोअर परळमधील घर विजेत्यांनी घरे परत केली होती. १ कोटी ९५ लाखांची घरे जर लोकांनी परत केली, तर ५ कोटींची घरे कशी विकली जाणार हा विचारही म्हाडाने न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या वर्र्षीच्या लॉटरीत लोअर परळमधील २ घरे १ कोटी ९५ लाखांत, तर याच भागातील ३४ घरे १ कोटी ४५ लाखांत विकली गेली होती. घरांच्या या किमती पाहून अपेक्षेपेक्षा कमी अर्जदार आले होते, शिवाय ज्यांना कोटींची घरे लॉटरीमध्ये मिळाली, अशा ३४ पैकी २६ जणांनी लॉटरीत लागलेली महागडी घरे म्हाडाला परत केली. यातील बहुतांश घरे आजही पडून आहेत. २६ घरे परत आल्याने म्हाडाची नाचक्की झाली. त्यानंतर, म्हाडाने या घरांच्या किमती कमी केल्या. पण यातूनही बोध न घेता, म्हाडाने या वर्षी दुरस्ती मंडळाकडून आलेल्या घरांच्या किमती थेट ५ कोटींच्या घरात नेऊन ठेवल्या आहेत.म्हाडाने नुकत्याच प्रत्येक उत्पन्न गटातील घरांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या उच्च उत्पन्न गटातील घरे रेडिरेकनरच्या ७० टक्के दराने विकली जातील. त्यानुसार, या घरांची किंमत ५ कोटी ८० लाख आहे, अन्यथा या घरांची किंमत ८ कोटींच्या घरात गेली असती. अशी महागडी घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, त्यांना किती प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आतापर्यंतच्या लॉटरीच्या इतिहासातील महाग घरग्रँटरोडच्या कंबाला हिल्स येथील धवलगिरी सोसायटीत ही ३ घरे लॉटरीत समाविष्ट केली आहेत. म्हाडाच्या लॉटरीच्या इतिहासात हे सर्वात महाग घर आहे. या घराचे क्षेत्रफळ ९८५ चौरस फूट आहे. या घरांसाठी १०० हून जास्त अर्जदार येतील, असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आहे. मात्र, लॉटरी लागूनही ही महागडी घरे म्हाडाकडेच परत केली जातात, हा इतिहास असूनही म्हाडाने अशा न विकल्या जाणाºया घरांचा समावेश लॉटरीत का केला? त्या बदल्यात ३ घरे अल्प उत्पन्न गटात वाढविली असती, तर जास्त फायदा झाला असता, असा सूर सामान्य ग्राहकांत आहे.म्हाडा लॉटरीसाठी तासाभरात अकराशे अर्जमुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या १,३८४ सदनिकांच्या विक्रीकरिता सोमवारी आॅनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. आॅनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यावर, पहिल्या तासाभरातच सुमारे १,१०६ अर्जदारांनी नोंदणी केली.जाहीर संगणकीय सोडतीचा ‘गो लाइव्ह’ समारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी झाला. अर्ज नोंदणी व आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दुपारी २ वाजता प्रारंभ झाला. पहिल्या तासाभरातच सुमारे १,१०६ अर्जदारांनी तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत २,४०० अर्जदारांनी नोंदणी केली असून, ७०० अर्जदारांनी आॅनलाइन अर्ज भरून सादर केले आहेत.या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी, एनईएफटी/आरटीजीएसद्वारे पेमेंट करण्याकरिता, तसेच डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट करण्याकरिता ५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत आहे. १६ डिसेंबरला २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात सोडत निघेल.तर, म्हाडाच्या १,३८४ घरांसाठीच्या सोडतीसाठी पहिल्याच दिवशी आॅनलाइन नोंदणीला मिळालेला प्रतिसाद चांगला आहे. घरांच्या किमती या म्हाडाने २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्यामुळे घरांसाठी जास्तीतजास्त अर्ज येतील असा विश्वास आहे, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.
म्हाडाच्या महागड्या घरांना प्रतिसाद मिळेल? प्रश्नचिन्ह कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:43 AM