Shivsena: मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:02 AM2022-10-23T11:02:03+5:302022-10-23T11:02:58+5:30
सध्या दिवाळी सुरू असल्याने अनेक फटाके वाजत आहेत. काही लवंगी मिर्च्या तडतड करत आहेत, छोटे छोटे फुलबाजेही आपला चमकपणा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत
मुंबई - राज्यातील मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला. मैदान मारुन काही तास उलटत नाहीत, तोच नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ट्विट केले असून, यानिमित्ताने पुन्हा एका चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे, नार्वेकर हे शिंदे गटात सामिल होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.
सध्या दिवाळी सुरू असल्याने अनेक फटाके वाजत आहेत. काही लवंगी मिर्च्या तडतड करत आहेत, छोटे छोटे फुलबाजेही आपला चमकपणा दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, काही फुसके बारही होत आहेत. मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार ही चर्चा भाजपकडून पेरली जात आहे. ती अशाच एका फुसक्या बारपैकी एक बार आहे, जो काही केल्या वाजत नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. तसेच, राणे पिता-पुत्रांवरही अंधारे यांनी टीका केली. सध्या राणे पुत्र हे गुडघ्याला पॅड बांधून स्टेडियममध्ये बसलेले आहेत, त्यांना कुणीतरी खेचावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पण, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पॅव्हेलियनमध्येच बसून राहावे लागेल. आमचा सामना देवेंद्र फडणवीसांसोबतच आहे, तो आम्ही लढतोय, असे म्हणत अंधारे यांनी राणेंवरही टीका केली.
नार्वेकरांबद्दल किशोरी पेडणकरांनीही स्पष्टच सांगितलं
मिलिंद नार्वेकर यांची ही कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीतूनच झाली आहे. शुभेच्छा देणं ही आपली राजकीय संस्कृती आहे. मी सुद्धा अमित शाह यांना शुभेच्छा देते, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. शिंदे गटाला आता काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे हा नाराज, तो महाराज…अशा अफवा ते पसरवत असतात, अशी टीकाही किशोरी पेडणेकरांनी केली आहे.
दरम्यान, मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याचे मी ऐकतोय. नार्वेकर यांचे अमित भाईंशी संबंध चांगले आहेत. मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज आहेत. शिवसेनेत कोण राहील आणि कोण जाईल हे सांगता येत नाही, असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते. मुंबई महापालिकेत भाजची सत्ता येणार आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र महापालिका लढणार आहे. मात्र मनसेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.