मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना सोबत घेत नवा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे आमदारांचा मोठा गट गेल्यामुळे दोन तृतीयांश नियमाप्रमाणे सर्वांत मोठा गट कुणाचा तसेच एकनाथ शिंदे थेट शिवसेनेवर हक्क सांगू शकतात का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बाजूला करून एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकतात का?, अशीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण बिराजदार यांचे ‘ट्वीट थ्रेड’ व्हायरल झाले आहे. या थ्रेडमध्ये त्यांनी शिवसेनेची घटना कागदपत्रांसह स्पष्ट केली आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुखांचे अधिकार, निवडीचे अधिकार, प्रतिनिधी सभा यासह कार्यकारिणी निवडीच्या अधिकारांबाबत माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरेंना बाजूला सारून शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकतात का?, यावर भाष्य करताना त्यांनी सद्य:स्थितीत ते अशक्यप्राय वाटते. कारण, प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात नियम, अधिकार निश्चित केलेले असतात, असे सांगितले आहे. पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना अधिकृत असते. आता शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेनाप्रमुखांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मदतीने आता शिंदे त्या पदावर बसू शकतात का?, तर त्याचे उत्तर शिवसेनेच्या घटनेनुसार ‘नाही’ असेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य?
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना शिवसेनेत ‘पक्षनेते’ म्हणून ओळखले जाते. २०१८ मध्ये प्रतिनिधी सभेने ९ जणांना पक्षनेते म्हणून निवडून दिले. विशेष बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे निवडून आले नाहीत, पण आदित्य ठाकरे निवडून आले. ही निवड ५ वर्षांसाठी असते. १. उद्धव ठाकरे २. आदित्य ठाकरे ३. मनोहर जोशी ४. सुधीर जोशी ५. लीलाधर डाके ६. सुभाष देसाई ७. दिवाकर रावते ८. रामदास कदम ९. संजय राऊत १०. गजानन कीर्तीकर.
शिवसेनाप्रमुख असे काम करतात
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मंजुरीने शिवसेनाप्रमुख काम करतात. यात महत्त्वाची बाब अशी की, शिवसेनाप्रमुख हे प्रतिनिधी सभेचे सदस्य निवडून देतात. ज्यात फक्त आमदार, खासदार नसतात, तर जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख ते मुंबईतील विभागप्रमुख असतात. २०१८ मध्ये एकूण २८२ प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख पदी निवडून दिले होते. म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मंजुरीने शिवसेनाप्रमुख काम करतात, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १४ सदस्य हेसुद्धा प्रतिनिधी सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती शिवसेनाप्रमुख करतात.
शिंदे पक्षाची घटना बदलू शकतात?
शिवसेनाप्रमुखांच्या अधिकारानुसार ज्या ४ जणांना ते पक्षनेते (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) म्हणून नियुक्त करू शकतात. त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह अनंत गीते, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार शिवसेनाप्रमुखांकडे असतो. आता शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना ताब्यात घ्यायचा असेल, तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावे लागेल, त्यात २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांना सोबत घ्यावे लागेल तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो. शिंदेंनी पक्षाची घटना बदलण्याचा प्रयत्न केला, तर ते अपयशी ठरतील.कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला देण्यात आले आहेत. त्यात शिंदे गटाचे संख्याबळ कमी आहे. त्यातही वाद झाला, तर शिवसेनाप्रमुखांचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे शिंदेंना वेगळा गट, पक्ष काढण्यापलीकडे पर्याय दिसत नाही, असे दिसते.