सवरांचे मंत्रीपद सूर्या कालव्याची दुरुस्ती करणार?
By admin | Published: November 6, 2014 11:19 PM2014-11-06T23:19:27+5:302014-11-06T23:19:27+5:30
असा सवाल शेतकरी करीत आहेत. गेल्या पाच वर्षापासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणात नादुरूस्त झाले आहेत
कासा : डहाणू व पालघर तालुक्यातील शेतीला व गावांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणारा सूर्या धरणाचा कालवा गेले पाच वर्षे फुटला असून त्याची दुरुस्ती सवरा हे कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे आता तरी होईल काय? त्यांचे मंत्रीपद त्याच्या डागडुजीसाठी खर्ची पडेल काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत. गेल्या पाच वर्षापासून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या या कालव्यांची दुरूस्तीच न झाल्याने कालवे मोठ्या प्रमाणात नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे यंदाही शेतीला अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. इतके दिवस पालघर जिल्ह्याचा आवाज मंत्रालय आणि प्रशासनात उठवलाच जात नव्हता आता सवरांमुळे या स्थितीत फरक पडेल काय? सहापैकी विक्रमगड आणि डहाणू अशा दोन मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. हे लक्षात घेऊन तरी या कालव्याची दुरुस्ती आता होईल काय? असाही सवाल या भागातील बळीराजा करीत आहे.
आदिवासी भागातील डहाणू, पालघर व विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर शेती सूर्या कालव्याअंतर्गत सिंंचनाखाली आणण्यात आली आहे. डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात सूर्या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. पावसावरील भातकापण्या व शेतीची कामे पूर्ण होताच डिसेंबरच्या १५ तारखेपर्यंत उन्हाळी भातशेतीसाठी कालव्यातून पाणी सोडले जाते. (प्रतिनिधी)