मुंबई - बहुचर्चित कोहिनूर कथित गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली आहे. २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरेंना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. राज ठाकरेंना आलेल्या नोटिशीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन अशाप्रकारे दबावतंत्राचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
राज यांना मिळालेल्या ईडीच्या नोटिशीनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं होतं. राज ठाकरेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत त्यामुळे ठाणे बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंच्या आदेशानंतर हा बंद मागे घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ईडीच्या कार्यालयात २२ ऑगस्टला मनसेच्या कार्यकर्त्यांना जमण्याचे आवाहन केले. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जातील त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जमावे, मनसैनिकांचे हे शक्तीप्रदर्शन असेल असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले होते.
मनसे कार्यकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: कार्यकर्त्यांना आवाहन करून ईडी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये असं बजावलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे. त्यामुळे येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत.
मात्र ठाण्यात मनसेच्या एका कार्यकर्त्यांना राज ठाकरेंना बजावलेल्या ईडी नोटिशीचं तणाव घेतल्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे राज ठाकरेंच्या आदेशानंतरही मनसे कार्यकर्ते शांत बसतील का हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी धरपकड करण्याची तयारीही पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच मुंबईतील बसेसच्या सुरक्षेसाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
गुरुवारी राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जातील. अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला राज ठाकरे उत्तरं देतील. मात्र जोपर्यंत राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात आहेत तोपर्यंत मनसैनिक शांत बसतील का यावर प्रश्नचिन्ह आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, कुठेही अहिंसक घटना घडू नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. एकंदर पाहता उद्या शहरात काय होईल याची काळजी सगळ्यांनाच लागून राहिली आहे.