Join us  

मोटरमनचे मतदान हुकणार ?

By admin | Published: October 13, 2014 4:06 AM

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काही मोटरमनचे मतदान हुकण्याची चिन्हे आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रेल्वेच्या मोटरमनना बरीच धावपळ करावी लागते.

मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही काही मोटरमनचे मतदान हुकण्याची चिन्हे आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रेल्वेच्या मोटरमनना बरीच धावपळ करावी लागते. लोकसभा निवडणुकीत जवळपास १५0 मोटरमन मतदानापासून वंचित राहिले होते. व्यग्र वेळापत्रकामुळे दरवेळी काही मोटरमन मतदानापासून वंचित राहतात. त्यांची ड्युटी साधारण सहा ते आठ तासांची असते. ती संपेपर्यंत मतदानाची वेळ टळून जाते. पहाटेची ड्युटी लागल्यास त्यांना बरीच धावपळ करावी लागते. मध्य रेल्वेचे जवळपास ६00 तर पश्चिम रेल्वेचे ५00 मोटरमन असून, मागील लोकसभा निवडणुकीत या दोन्ही रेल्वेतून १५0 मोटरमन निवडणुकीपासून वंचित राहात होते. व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना फटका बसत असल्याने त्यांनी यासाठी रेल्वे प्रशासनाकडे धाव घेतली होती. त्यामुळे अगदी कमी कालावधीत त्यांच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव करण्यात आली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मोटरमनकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या प्रयत्नांना अपयश येत असून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच जवळपास १५0 मोटरमन मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोटरमनच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव होत असून यात रेल्वेकडूनही कुठली रुची दाखवण्यात येत नसल्याचे एका मोटरमनकडून सांगण्यात आले. त्यामुळे १५ आॅक्टोबरच्या मतदानासाठी आम्ही १४ आॅक्टोबरपर्यंत तरी वेळापत्रकाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एका मोटरमनकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)