मुंबादेवी यंदाही अमिन पटेलांना पावणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:21 AM2019-08-24T06:21:36+5:302019-08-24T06:21:48+5:30

आघाडीला मताधिक्य मिळाले त्यापैकी मुंबादेवी या एकमेव मतदारसंघात तब्बल ३५ हजारांचे तगडे मताधिक्य लाभले. काँग्रेसचे अमिन पटेल येथील विद्यमान आमदार आहेत. लोकसभेचा ट्रेंड अमिन पटेल आणि काँग्रेससाठी उत्साहवर्धक ठरला.

 Will Mumbadevi also get Amin Patel? | मुंबादेवी यंदाही अमिन पटेलांना पावणार का?

मुंबादेवी यंदाही अमिन पटेलांना पावणार का?

Next

- गौरीशंकर घाळे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व सहा जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ३१ क्षेत्रांतून युतीचे उमेदवार आघाडीवर होते. तर, अवघ्या पाच विधानसभा मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. लोकसभेचा हा ट्रेंड विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढविणारा आहे. ज्या पाच जागांवर आघाडीला मताधिक्य मिळाले त्यापैकी मुंबादेवी या एकमेव मतदारसंघात तब्बल ३५ हजारांचे तगडे मताधिक्य लाभले. काँग्रेसचे अमिन पटेल येथील विद्यमान आमदार आहेत. लोकसभेचा ट्रेंड अमिन पटेल आणि काँग्रेससाठी उत्साहवर्धक ठरला.
या विधानसभा मतदारसंघाचे नाव मुंबादेवी असले तरी मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिर या मतदारसंघात येत नाही. २००९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या मतदारसंघ फेररचनेमुळे या मतदारसंघाचा चेहरामोहराच बदलला. तत्पूर्वी १९९०, ९५, ९९ आणि २००४ या चार निवडणुकांत भाजपचे राज पुरोहित येथून आमदार होते. फेररचनेनंतर त्यांनी शेजारचा कुलाब्यातून निवडणूक लढविणे पसंत केले. फेररचनेनंतरच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ असे सलग दोनवेळा अमिन पटेल वियजी झाले. यंदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. पटेल यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि लोकसभेत काँग्रेस उमेदवाराला मिळालेले मताधिक्य यामुळे काँग्रेसकडून तेच उमेदवार असतील हे निश्चित आहे. प्रामुख्याने मुस्लीमबहुल असणारा हा मतदारसंघ जुन्या इमारती आणि छोट्यामोठ्या व्यापार, उद्योगधंद्यांनी व्यापलेला आहे.
मुस्लीमबहुल असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसाठी अनुकूल मानला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत झाली होती. युती आणि आघाडी फिस्कटल्याने सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले. एमआयएमचाही वारू पाच वर्षांपूर्वी जोरात होता. त्यातच एमआयएमने महान गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफीला मैदानात उतरवले होते. त्यांनी तब्बल १६ हजार मते खेचल्याने ही निवडणूक भलतीच अटीतटीची झाली. एमआयएमचा पाच वर्षांपूर्वीचा प्रभाव आता नाही.
मागील निवडणुकीत येथे भाजपचे अतुल शाह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी तब्बल ३० हजार मते खेचली. तर, शिवसेनेच्या युगंधर साळेकरांनी १५ हजार मते घेतली. युती झालीच तर मतदारसंघावर भाजपचा दावा राहील आणि अतुल शाह पक्षाचे उमेदवार असतील. शाह यांनी दोन वर्षांपासून कामाला सुरुवातही केली आहे. अलीकडेच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अतुल शाह यांनी नाट्यमय विजय मिळविला होता. नळबाजार, कामाठीपुरा, ग्रँट रोडचा सहभाग असणाºया वॉर्ड क्रमांक २२०मधून शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर अवघ्या तीन मतांनी विजयी ठरले होते. त्यानंतर शाह यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यात दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या प्रथेप्रमाणे लॉटरी काढण्यात आली. पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवारांच्या चिठ्ठ्या उडविण्यात आल्या. सात वर्षांच्या मुलीने लकी ड्रॉ पद्धतीने उचललेली चिठ्ठी अतुल शाह यांच्या नावाची निघाली आणि शाह नगरसेवक झाले.
मतदारसंघात मुस्लीम मते काँग्रेससाठी एकगठ्ठा ठरतात. मात्र, ट्रीपल तलाकसारख्या निर्णयांचा थोडाफार परिणाम होईल. सर्वच नाही तर किमान काही टक्के मते भाजपकडे वळतील, या आशेवर भाजप आहे. सरकारच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ मुस्लीम कुटुंबांनासुद्धा झाल्याचे सांगत हा मतदार वळविण्याचा प्रयोग लोकसभा निवडणुकीदरम्यान झाला. मात्र, त्यात यश आले नसल्याचे निकालाने दाखवून दिले. त्यामुळे भाजपला इथे भलताच जोर लावावा लागणार आहे.
(उद्याच्या अंकात वाचा : मालाड मतदारसंघ)

मतदारांची संख्या
- पुरुष : १,३२,८६०
- महिला : १,०४,८७५
- एकूण मतदार : २,३७,७४३
विधानसभा निवडणूक २०१४
१) अमिन पटेल, काँग्रेस : ३९,१८८
२) अतुल शाह, भाजप : ३०,६७५
३) मोहम्मद रफी,
एमआयएम : १६,१६५
४) यशवंत साळेकर,
शिवसेना : १५,४७९
५) इम्तियाज अनीस, मनसे : ३६०१
नोटा : ८०२
मतदानाची टक्केवारी : ४६.३७ %

Web Title:  Will Mumbadevi also get Amin Patel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई