Join us

मुंबईचे ‘डायमंड’ सुरतला जाणार का?

By मनोज गडनीस | Published: December 24, 2023 10:17 AM

सुरत येथे नुकतेच ‘सुरत डायमंड बोर्स’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

सुरत येथे नुकतेच ‘सुरत डायमंड बोर्स’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सुरत येथेही आता डायमंड बोर्स सुरू झाल्यामुळे त्याचा मुंबईतील हिरे उद्योगावर परिणाम होईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, याचा मुंबईतील उद्योगावर कोणताही परिणाम होणार नसून, उलट हिरे व्यापाराचा आणखी विस्तार होणार असल्याचे मत या क्षेत्रातील उद्योजक, तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याचा मनाेज गडनीस यांनी घेतलेला आढावा.  

इटलीच्या धर्तीवर नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क 

आलिशान जेम्स अँड ज्वेलरी पार्क निर्मितीसाठी नवी मुंबई येथील महापे येथे २० एकर जागा देण्यात आली असून, इटली व तुर्कस्थानच्या धर्तीवर आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ तेथे उभा राहतोय. या पार्कसाठी ५ एफएसआय देण्यात आला आहे. वीजदरात सवलत, तसेच जीएसटीतून दिलासा, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

सुरत येथे डायमंड बोर्स उभारल्यामुळे मुंबईच्या कामकाजावर परिणाम होईल, असे मी मानत नाही. भारत हिरेनिर्मितीमध्ये अग्रणी होता, आहे आणि पुढेही राहील. मानवनिर्मित हिरे म्हणजे लॅब ग्रोन डायमंड्स सध्या जगात लोकप्रिय होत असून, भारत त्याही क्षेत्रात पुढे आहे. त्यादृष्टीने मुंबई व सुरत या दोन्ही बोर्सचे महत्त्व आणि भूमिका परस्पर पूरक राहतील. स्पर्धा जरूर असेल; पण ती व्यवसायाच्या आणि व्यावसायिकांच्या हिताचीच असेल. सुरत हे प्राचीन काळापासून हिऱ्यांचे निर्मिती केंद्र आहे. आमचे येथील अनेक हिरे व्यापारीदेखील सुरत डायमंड बोर्समध्येदेखील व्यवसाय करणार आहेत. व्यवसायाच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. - अनुप मेहता, अध्यक्ष, भारत डायमंड बोर्स

हिरे बाजार मुंबईतून सुरतला जात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरले. ज्यांना मुंबईची ओढ आहे, ते कधीच सुरतला जाणार नाहीत. तिथे कार्यालय सुरू करू शकतील; पण त्यामुळे व्यापार वाढण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबईचा हिरे बाजार सुरतला जाणार नसून, भारतीय हिरे उद्योगाला सुरत डायमंड बोर्सच्या रूपाने आणखी एक मोठी बाजारपेठ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर सुरतला आणखी एक हिरा मिळाल्याचे सांगितले आहे. - हार्दिक हुंडिया, हिरे बाजारातील तज्ज्ञ 

५० वर्षांपूर्वी मुंबईतल्या झवेरी बाजारात २५ ते ३० लोकांनी हा व्यवसाय सुरू केला. तो झवेरी बाजार, ऑपेरा हाउस मग बीकेसी असा विस्तारतच गेला. हा व्यापार आता जगभरात पसरला आहे. याची व्याप्ती अमेरिकेतील न्यूयॉर्क, लॉस एन्जेलिस, बेल्जियम, शांघाय, हाँगकाँग, द. आफ्रिका, इस्रायल, जपान आदी देशांपर्यंत विस्तारली आहे. या क्षेत्राच्या उत्पादन आणि निर्यातीमध्ये भारतीयांची मक्तेदारी आहे. मुंबईत जसा या उद्योगाचा विस्तार झाला त्या विस्ताराची पुढची पायरी म्हणून सुरतकडे पाहायला हवे. - किरीट भन्साळी,  उपाध्यक्ष, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल.

 

टॅग्स :सूरत