Join us

दोन वर्षांत मुंबई रस्ते खड्डेमुक्त होणार का? ४०० किमी रस्त्यांसाठी ६ हजार कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 11:10 AM

महापालिकेने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांवरून महापालिकेवर चौफेर टीका होत असतानाच आता मुंबई महापालिकेने सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ५ हजार ८०० कोटींच्या पाच निविदा मागविल्या आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटने बांधले जाणार असून, त्यामुळे दोन वर्षांत संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

महापालिकेने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपन्यांकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यात संयुक्त भागीदारी उपक्रमाला परवानगी देण्यात आलेली नाही. रस्ते कामांची माहिती देण्यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड असणार आहेत. पदपथांवर दिव्यांग स्नेही पद्धतीने रचना असणार आहे. उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र भूमिगत मार्ग, पावसाचे पाणी मुरण्यासाठी शोषखड्डे, गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थेची नेमणूक आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या तरतुदींचा निविदांमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

 मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ते बांधणी केली जात आहे. आतापर्यंत ९८९.८४ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते सुधारण्याच्या दृष्टीने काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. 

२०२२-२०२३ मध्ये काय? २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम होत आहे. २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित आणखी ४२३ किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी हाती घेतली जातील. 

निविदांमध्ये काय? मुंबईतील ७१ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी १ हजार १९४ कोटी.  पूर्व उपनगरातील ७० किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ८११ कोटी. पश्चिम उपनगरांमधील २७५ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ३ हजार ८०१ कोटी.

टॅग्स :मुंबई