‘एमयूटीपी ३ अ’ला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:08 AM2019-03-06T06:08:54+5:302019-03-06T06:09:00+5:30

मुंबईकरांना सुखकर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी तसेच उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) ने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत.

Will MUTP3A get Cabinet approval? | ‘एमयूटीपी ३ अ’ला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार का?

‘एमयूटीपी ३ अ’ला मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार का?

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : मुंबईकरांना सुखकर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी तसेच उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (एमआरव्हीसी) ने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमयूटीपी ३ अ ला मान्यता आणि निधी घोषित होईल का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.
राजकीय पटलावर निवडणुकीचे वारे वाहत असून घोषणांचा पाऊस सत्ताधारी मंत्र्यांकडून पाडण्यात येत आहे. मंत्र्यांकडून आचारसंहितेच्या आधी अनेक प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मुंबईचा चेहरा बदलणाऱ्या एमयूटीपी ३ अ प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एमयूटीपी ३ अ मधील ५४ हजार ७७७ कोटी रुपयांच्या १४ प्रकल्पांना मान्यता मिळाल्यास मुंबईचे रुपडे पालटण्यास मदत होणार आहे.
५५ किमीची सीएसएमटी ते पनवेल जलद रेल्वे मार्गिका, ७० किमीची पनवेल-विरार रेल्वे मार्गिका, ७ किमीचे हार्बर मार्गावरील गोरेगाव ते बोरीवली विस्तारीकरण, २६ किमीची बोरीवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका, ३२ किमीची कल्याण-आसनगाव चौथी रेल्वे मार्गिका, १४ किमीची कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका, कल्याण यार्ड, स्थानकांचे नूतनीकरण यासह इतर प्रकल्पांसाठी ५४ हजार ७७७ कोटींच्या प्रकल्पांला मंजुरी मिळणे आणि निधी उभारणे आवश्यक आहे.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार ५०-५० टक्के निधी देणार आहेत. त्यामुळे शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमयूटीपी ३ अ प्रकल्पावर विचार करण्यात येणार की नाही? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
।...तर वाढीव सुविधांसाठीचा मार्ग होणार खुला
सीएसएमटी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एमयूटीपी प्रकल्पांचे कौतुक केले. मुंबईचा चेहरा बदलणारा एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एमयूटीपी ३ अ वर सकारात्मक निर्णय झाल्यास भविष्यात मुंबईत वाढीव सुविधा मिळविण्याचा मार्ग खुला होईल, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Will MUTP3A get Cabinet approval?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.