मुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून, 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पब आणि बारसाठी नवे नियम नाहीत, पूर्वीप्रमाणेच दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार असल्याचंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी, मुंबईप्रमाणे पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याचा काही प्रस्ताव आहे का, या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी मजेशीर उत्तर दिलं.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य यांनी पुण्यातील नाईट लाईफच्या प्रश्नावर मेजशीर उत्तर दिले. कारण, पुण्यातील लोकं दुपारी 1 ते 4 या वेळेत झोपलेला असतात, किंवा 1 ते 4 या वेळेवरुन पुणेरी पाट्या किंवा पुणेकरांबद्दल जोक्स व्हायरल होतात. आदित्य ठाकरेंनीही असंच काहीसं मजेशीर उत्तर दिलंय. 'पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरू करतोय', असे आदित्य यांनी म्हटले. आदित्य यांच्या या उत्तरावर एकच हशा पिकला.
दिवाळी आणि गणपतीच्या सणांच्या वेळी आपण रात्रभर फिरत असतो. नाइटलाइफ सुरू केल्यानं अनेक जण तीन शिफ्टमध्ये काम करतील. महसुलाबरोबरच नोकऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. आतापर्यंत पोलीसवाले दीड वाजेपर्यंत दुकानं खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत होते. त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचं असून, त्यांना खरं पोलिसांचं काम करायला देणार आहे, असेही आदित्य यांनी म्हटले.
जर कोणत्याही मॉल किंवा कंपनीला वाटलं खासगी सुरक्षा द्यावी, तर तीसुद्धा आम्ही पुरवणार आहोत. उत्पादन शुल्काचे कायदे बदललेले नाहीत. सर्व अभ्यास करूनच हा प्रस्ताव मांडला असून, तो कार्यान्वित होणार आहे. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होणार असून, या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून, उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचेही ठाकरेंनी सांगितले. या उपक्रमात आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास मुंबईकरांना सेवा-सुविधा मिळणार असल्याने उद्योग-रोजगार वाढेल. रात्रभर कामानिमित्त घराबाहेर असणा-यांची सोय होईल. त्यामुळे नाइटलाइफ फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनोरंजनासोबत रोजगारनिर्मिती करणे, पर्यटन वाढविणे हा नाइटलाइफ सुरू करण्याचा उद्देश आहे. मात्र व्यवसायातील फायद्याच्या दृष्टीने आठवडाभर 24 तास दुकाने, मॉल आदी खुले ठेवायचे की नाही, हा निर्णय त्यांच्या मालकांवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.