मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे कारशेड आरे कॉलनीमध्ये बांधले जाणार असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक झाडांची कत्तलही केली जाणार, अशी नोटीस २०१४ साली पर्यावरणप्रेमींच्या निदर्शनास आली; तेव्हापासून ‘आरे वाचवा’ ही चळवळ सुरू झाली. आज या चळवळीला पाच वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने आरेतील पिकनिक पॉइंट येथे रविवारी चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले होते. या वेळी विकास प्रकल्पांसाठी आता एकाही झाडाला हात लावू देणार नाही, असा निर्धार पर्यावरणप्रेमींनी केला.पिकनिक पॉइंट येथे जमलेल्या पर्यावरणप्रेमींनी मोठ्या उत्साहात मोहिमेला सुरू झालेल्या सहाव्या वर्षाचे स्वागत केले. या वेळी उपस्थित असलेले मोहिमेचे कर्ताधर्ता यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. तसेच आपण केव्हा या मोहिमेशी जोडलो गेलो, याबाबत प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या अनुभव उपस्थितांना सांगितले. तसेच आरेतील झाडे वाचविण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देत राहू, अशी शपथ मानवी साखळी तयार करून पर्यावरणप्रेमींनी घेतली.वनशक्ती प्रकल्पाचे संचालक डी. स्टॅलिन म्हणाले की, सेव्ह आरे मोहिमेला पाच वर्षे पूर्ण झाली. मोहीम सुरू केल्यावर लोक वाढत गेले आणि मोहिमेचा आज वटवृक्ष झाला आहे. भविष्यात पर्यावरणावर कोणते संकट येणार आहे, यासाठी सावधगिरी आणि जाणीव करून देण्यासाठी पर्यावरणप्रेमींना एकत्र बोलावण्यात आले होते.पुढील काळात मोहिमेला एक चांगली दिशा कशी देता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले. ही मोहीम शांततेत कशी पुढे घेऊन जाता येईल, याकडे जास्त लक्ष कसे देता येईल; यावर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पांसाठी झाडाला हात लावू देणार नाही; आरे मोहिमेला पाच वर्षे पूर्ण, पर्यावरणप्रेमी एकवटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 3:34 AM