ठाणे : मराठी प्रेक्षक, मराठी कलाकार म्हणून हिंदी भाषेवर माझा राग नाही, परंतु ती भाषा जर माझ्या भाषेच्या मुळावर उठत असेल, तर मला आवाज उठवावा लागेल, असा इशारा अभिनेता सुबोध भावे यांनी रविवारी येथे दिला. मराठी साहित्य, मराठी भाषेला प्राधान्य द्या आणि मराठीत बोलण्याची लाज बाळगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.चारशेव्या अभिनय कट्ट्यावर भावे यांची मुलाखत कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी घेतली. मला हिंदी चित्रपटसृष्टीचे कधीही आकर्षण नव्हते. मराठी अभिनेता म्हणून मला अभिमान आहे. हिंदी चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका मला करायची नाही. माध्यम महत्त्वाचे नसते, तर काम करता येणे महत्त्वाचे असते. रंगमंचावर काम करण्याबरोबर पडद्यामागे काम करण्याची जबाबदारीही तितकी जास्त असते. कोणत्याही कलाकाराचा प्रवास संपूर्ण होत नसतो.कलाकाराचे जीवन हे शाळेतल्या पाटीसारखे असावे. त्या पाटीला नव्याने कोरता आले पाहिजे. मी सुबोध भावे म्हणून एक सामान्य माणूस आहे, परंतु माझ्या भूमिकांनी मला असामान्य बनविले, हे जोपर्यंत मी माझ्यात भिनवत नाही, तोपर्यंत मी नव्याने भूमिका करत नाही. कोणत्याही महापुरुषांच्या भूमिका साकारताना त्यांच्या कामाचा, व्यक्तिरेखांचा आदर केला पाहिजे. कलेप्रति कलाकारांची वृत्ती समर्पणाची असावी, असे भावे या वेळी म्हणाले. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी प्रेक्षकांवर जादू केली होती. ते प्रेक्षकांसाठी काम करणारे अभिनेते होते. आमच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये खूप फरक आहे. नक्कल म्हणजे अभिनय नव्हे. कारण नक्कल वरवर असते आणि अभिनय हा आतून असतो. डॉ. घाणेकर खऱ्या आयुष्यात कोणाला झेपले नाही, तर मला कसे झेपणारे होते, असे ते म्हणाले.‘अभिनय कट्टा गौरव’ पुरस्कार प्रदानसुबोध भावे यांना नाकती यांच्या हस्ते ‘अभिनय कट्टा गौरव पुरस्कार-२०१८’ प्रदान करण्यात आला. अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा दुर्दैवाने पुण्यात नाही. असा कट्टा असता, तर तो नियमांतच गेला असता, अशी विनोदी टिप्पणी करत पुणेकरांचे कर्तृत्व मोठे आहे, अशा शब्दांत त्यांनी पुण्याचे कौतुकही केले.
हिंदीचे मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही - सुबोध भावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 4:24 AM