Join us  

थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही -गिरीश महाजन

By admin | Published: March 21, 2015 1:38 AM

महाराष्ट्राच्या वाट्याचे थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.

मुंबई : महाराष्ट्राच्या वाट्याचे थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. याबाबत विधान परिषद सदस्यांना सादरीकरण देण्यात येईल व याबाबत सभागृहात चर्चा करण्यास सरकारची तयारी असल्याचेही महाजन यांनी सांगितले.जयवंतराव जाधव, अनिल भोसले आदी सदस्यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातील २० टीएमसी पाणी मुंबईला देऊन उर्वरित ६३ टीएमसी पाणी गुजरातला दिले जाणार असल्याकडे तसेच नारपार खोऱ्यातील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील ३२ टीएमसी पाणी गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्रमध्ये नेण्यात येणार असल्याचा आरोप जाधव व अन्य सदस्यांनी केला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे थेंबभरही पाणी गुजरातला दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले.गोदावरी-गिरणा खोऱ्यातील पाणी सध्या नैसर्गिकरीत्या अरबी समुद्रास वाहून जाते. हे पाणी गुजरातला देऊन तेवढेच गुजरातच्या हिश्शाचे पाणी तापी खोऱ्याच्या महाराष्ट्रातील भागास मिळण्याकरिता शासन प्रयत्नशील असल्याचे शिवतारे व महाजन यांनी सांगितले. यावरून सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. याबाबत चर्चा करावी, अशी मागणीही लावून धरली. अखेरीस यासंदर्भात सदस्यांना सादरीकरण करू व चर्चा करू, असे महाजन म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)