Join us

'शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमसोबत चर्चा मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 2:00 AM

आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी विधानसभेसाठी एमआयएम तसेच काँग्रेस आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबई : वंचितने आघाडीसाठी जाचक अटी ठेवल्याचा आरोप े फेटाळून लावताना काँग्रेसलाच आघाडी करण्यात रस नाही, त्यांना चर्चेचा केवळ देखावा निर्माण करायचा आहे. त्यामुळे आता चर्चेची दारे बंद झाली आहेत. काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. एमआयएमबाबत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत चर्चा केली जाईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी विधानसभेसाठी एमआयएम तसेच काँग्रेस आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही काँग्रेससमोर जाचक अटी ठेवल्या नाहीत. ज्या जागांवर काँग्रेस तीनपेक्षा अधिक वेळा हरली त्याच जागा मागितल्या. हरलेल्या जागा मागण्यात जाचक काय आहे, असा सवालही आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारी मंडळात काँग्रेस आघाडी युती संदर्भातील प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. वंचितच्या कार्यकारी मंडळाती सदस्य सातत्याने केंद्रीय काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांशी संपर्क करत होते. मात्र, चर्चेच्या निमित्ताने काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वसुद्धा बहुजन आघाडीचा वापर करून घेत आहे. काँग्रेसकडून केवळ चालढकल केली जात आहे. आम्ही युतीसाठी तयार आणि वंचित बहुजन मात्र तयार नाही, असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबत चर्चेची दारे बंद झाली असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले. काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही फरक पडलेला नाही. त्यांच्या या ब्लॅकमेलिंगमुळे आम्हीच काय, इतर घटक पक्षही त्यांच्यासोबत जात नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

वंचितही स्वबळावर लढणारएकीकडे लोकसभा निवडणुकीपासून सोबत असणाऱ्या एमआयएमने वंचितने बहुजन आघाडीशी काडीमोड घेतला आहे. त्यामुळे आता वंचित राज्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दोन दिवसांवर आलेल्या अनंत चतुर्दशीनंतर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरकाँग्रेस