ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - कुणालाही महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, असे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. सामनाच्या अग्रलेखातून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-यांवर टीका करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे कॉंग्रेसने अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करीत हुतात्मा स्मारकापासून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला, असेही ते म्हणाले होते. अग्रलेखात त्याचाच दाखला देत चव्हाणांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ' भाजप असो किंवा अन्य कुणी, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही,' असा इशारा देत महाराष्ट्र विभाजनाला स्पष्ट विरोध दर्शवण्यात आला आहे.
दरम्यान या लेखात काँग्रेसवरही कडाडून टीका करण्यात आली आहे. काँग्रेस नेते त्यांच्या कुटुंबियांसाठी तिकीट मिळवण्यात व्यस्त आहेत. मराठी जनतेने काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकले असून लोकसभा निवडणुकीत हे स्पष्ट दिसले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जरी रणशिंग फुंकले असले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे, असे लेखात म्हटले आहे.