वन्यजीवांबाबत कोणत्याही प्रकारची गैरकृती सहन करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:06 AM2021-04-04T04:06:17+5:302021-04-04T04:06:17+5:30
. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अनेकदा बिबट्याला नरभक्षक ठरवून पकडण्यात येते आणि कायमस्वरूपी पिंजऱ्यात ठेवले जाते. ज्या बिबट्याला ...
.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनेकदा बिबट्याला नरभक्षक ठरवून पकडण्यात येते आणि कायमस्वरूपी पिंजऱ्यात ठेवले जाते. ज्या बिबट्याला नरभक्षक म्हणून तुरुंगात डांबले जाते त्याची डीएनए चाचणी करायला हवी. बिबट्यांच्या हक्कांसाठी सर्वांनी आवाज आवाज उठवायला हवा. कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच वन्यजीवांबाबत कोणत्याही प्रकारची गैरकृती आम्ही कदापि सहन करणार नाही. असे मत प्राणी, वन्यप्राणी व पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे सुनिष कुंजू यांची मानद वन्यजीव रक्षक, मुंबई उपनगर या पदी दुसऱ्यांदा निवड केली. यावेळी ते बोलत होते.
सुनिष कुंजू हे पॉज संस्थेचे संस्थापक-सचिव असून ते एसीएफ संस्थेचे सहसंस्थापक आहेत. मागील दोन दशकांपासून कुंजू हे मुंबई व आसपासच्या परिसरातील वनस्पती संवर्धनासाठी आणि विकासासाठी कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक वन्यजीवांची सुटका केली.
यासोबतच जनसामान्यांमध्ये वन्यजीवांबद्दल जनजागृती, वन्यजीव व्यापार प्रतिबंध, वृक्षारोपण आणि साफसफाईच्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियाद्वारे चालू असलेले ऑनलाइन अनधिकृत वन्यजीव व्यापार, अवैध बाजारपेठ, पाळीव प्राण्यांच्या दुकानात वन्यजीव व्यापाराची माहिती कुंजू यांनी टीमच्या माध्यमातून वन्यजीव विभाग, वनविभाग, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो आणि पोलिसांना देऊन असंख्य वन्यजीवांची सुटका करून त्यांना निसर्गात मुक्त केले आहे. वन्यजीव शिकार, तस्करी, अनधिकृत व्यापार तसेच प्राण्यांची हेळसांड, प्राण्यांवरील अत्याचार होत असल्यास ९८३३४८०३८८ या एसीएफ पॉज - मुंबई हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.