Join us

पोलिसांवरील दबाव सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:06 AM

गृहमंत्र्यांचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...

गृहमंत्र्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असून तो कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी दिला.

विरोधकांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला असून त्यावर कारवाईचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. ब्रुकचे मालक राजेश जैन यांना विरोधकांच्या दबावामुळे नाही तर पत्र दाखविल्याने सोडण्यात आले. चौकशी सुरू असून बेकायदा कृत्य केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात ५० हजार रेमडेसिविरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसींचा पुरवठा करण्याचे पत्र असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते. पुरवठादाराने ते पत्र दाखवले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालक जैन यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.

* पोलीस कुणाचीही चौकशी करू शकतात

ब्रुक फार्माच्या मालकाला का बोलावले? कशासाठी बोलावले? असा सवाल करण्यात आला. पोलिसांना कुणालाही बोलावण्याचा अधिकार आहे. ते कुणाचीही चौकशी करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला बोलावल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारला इंजेक्शन पुरविण्यास असमर्थता का दाखवली? आणि ते कोणाला इंजेक्शन पुरविणार होते याबद्दल माहिती घेतली जात होती. याबद्दल चौकशी केली जात आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

.........................