सेनेच्या उमेदवारांची आज माघार होणार की नाही?
By Admin | Published: January 18, 2015 11:42 PM2015-01-18T23:42:35+5:302015-01-18T23:42:35+5:30
आधी ठाणे व शनिवारी पालघर तालुक्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जि.प. व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले
ठाणे/वसई : आधी ठाणे व शनिवारी पालघर तालुक्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जि.प. व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवणाचा पवित्रा सेनेने घेतल्याचे जिल्हा प्रमुख संदेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे तर सोमवारी सकाळी सर्व पक्षाच्या उमेदवारांना माघारीचे आवाहन करण्यात येणार असून त्यानुसार माघारी होईल, असा विश्वास शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज वसईत
सर्वपक्षीय बैठक होऊन उद्या सकाळी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या बैठकीला सेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण व सेना नेते वसंत वैती यांनी दांडी मारल्याने सेनेचे उमेदवार आपले अर्ज कायम ठेवतील की काय? याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते.
आज सकाळी झालेल्या या बैठकीला, काँग्रेस, भाजपा, बविआ व जनआंदोलन समिती इ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवरील बहिष्काराचे सूर आळवले.
या भाषणानंतर उद्या सकाळी ११.०० वाजता सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत असे ठरले. दरम्यान या बैठकीला सेनेचे नेते उपस्थित न राहिल्यामुळे सर्वत्र चर्चा होत होती. या बैठकीनंतर सेनेचे वसई-विरार जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणुका लढवण्याचा आम्हाला आदेश दिला आहे.
काल मनोर, येथे झालेल्या सर्वपक्षीय तसेच आज झालेल्या वसईतील बैठकीची माहिती आम्हाला कळवण्यात आली नव्हती. काल पालघरचे जिल्हाप्रमुख त्या बैठकीला गेले होते याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आमचे वरीष्ठ नेते या बाबत योग्य तो निर्णय घेतील. आम्ही या निवडणुका लढवणारच ठाणे जिपचे निकष वेगळे आहेत. तेथे जिपच्या जागा ५२ पेक्षा कमी होणार आहेत. तशी स्थिती पालघर जिल्ह्यात नाही, त्यामुळे निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी निर्णय घ्यावा व सर्व पक्षांनी त्यांच्या मागे फरफटत जावे, आम्ही स्वाभिमानी आहोत म्हणून ती फरफट आम्ही मान्य केली नाही, आम्ही या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणारच असे त्यांनी लोकमतला सांगितले.