मुंबई: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं राज्याच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. राज्यातील रुग्णवाढीत मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २५१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर २५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी गेल्या आठवड्याभरापासून रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन रुग्णवाढीच्या मुद्द्यावरुन चिंता व्यक्त केली. तसंच मुंबईत आजचा आजचा आकडा २ हजाराच्या पलिकडे जाईल असा अंदाज व्यक्त केला होता. टोपेंनी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून आज २५१० रुग्णांची नोंद झाल्याचं सरकारची चिंता वाढली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा ८ हजार ६० इतका झाला आहे.
मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यासाठी आता नियमांचं काटेकोर पालन होणं गरजेचं असल्यानं काही गोष्टी पालिकेनं ठरवल्या आहेत. यामध्ये महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्लॅन देखील महानगरपालिकेने तयार केला आहे.
मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे, असा आदेश चहल यांनी दिला आहे. कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स्, उपहारगृहांवर कठोर कारवाई कण्यात यावी, असं चहल यांनी सांगितलं. महानगरपालिका मुख्यालयात महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालिकेने याविषयी माहिती दिली. संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी व त्यासापेक्षा ७ दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे करणार असल्याचेही चहल यांनी सांगितले.
रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका-
मुंबईतील रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९७ टक्के इतकं नोंदविण्यात आळं आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ६८२ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या १ कन्टेंन्टमेंट झोन आणि ४५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत मुंबईत एकूम ५१ हजार ८४३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.