ऑनलाइन शिक्षणाला नाताळची सुट्टी मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 01:38 AM2020-12-18T01:38:05+5:302020-12-18T01:38:16+5:30
यंदा वार्षिक सुट्ट्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सात दिवसांवर आलेल्या नाताळची सुट्टी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार का? असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.
मुंबई : कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने शिक्षण विभागाने गणेशोत्सवात सुट्टी दिली नाही, तर दिवाळीमध्ये आठवडाभर सुट्टी दिली. त्यातच यंदा वार्षिक सुट्ट्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सात दिवसांवर आलेल्या नाताळची सुट्टी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार का? असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. शिक्षण विभागाने नाताळच्या सुट्ट्यांबाबत स्पष्ट करावे, अशी त्यांची मागणी आहे.
मुंबईतील अनेक माध्यमांच्या अनुदानित, खासगी शाळांमध्ये दरवर्षी २३ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत १० दिवस नाताळाची सुट्टी दिली जाते. परंतु यावर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने गणेशोत्सव व दिवाळीच्या सुट्टीबाबत उदासीन असणारा शिक्षण विभाग नाताळची सुट्टी तरी जाहीर करेल का? किंवा शाळा प्रशासनांना आपल्या अधिकाराचा वापर करून ही सुट्टी देता येईल का? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
परीक्षांचे आयाेजन करू नये
सुट्ट्यांमध्ये ऑनलाइन शिक्षण बंद राहील हे लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांसाठी कोणतेही प्रशिक्षण, गैरशैक्षणिक काम किंवा विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही उपक्रमाचे नियोजन करू नये. तसेच शाळांनीही सुट्ट्यांमध्ये घटक चाचणीसारख्या परीक्षांचे आयोजन करू नये, अशी मागणी शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली.