Join us

आॅनलाइन औषधविक्री बंद करणार का?

By admin | Published: October 29, 2015 1:00 AM

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गर्भपातासाठी गोळ्या खाल्ल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर, उच्च न्यायालयाने आॅनलाइन औषधविक्री बंद करण्यासाठी काय पावले उचलणार

मुंबई : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गर्भपातासाठी गोळ्या खाल्ल्याचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर, उच्च न्यायालयाने आॅनलाइन औषधविक्री बंद करण्यासाठी काय पावले उचलणार? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ अंतर्गत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय शेड्युल ‘एच’ मधील औषधे विकण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये गर्भपाताच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्यांचा समावेश आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आॅनलाइनद्वारे विकण्यात येतात. प्राध्यापिका मयुरी पाटील यांनी आॅनलाइन औषधविक्रीवर बंदी घालण्यासाठी अ‍ॅड. वल्लरी जठार यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर होती. एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी काही दिवस गैरहजर होती. काही दिवसांना पाटील यांना विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे समजले आणि तिने गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांचे बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून आॅनलाइनद्वारे गर्भपाताची गोळी मागवली होती, अशी माहिती अ‍ॅड. वल्लरी यांनी खंडपीठाला दिली. गेल्या सुनावणी वेळी खंडपीठाने याचिकाकर्तीला कशाप्रकारे फसवणूक करण्यात येते, याची संपूर्ण माहिती देण्यासाठी त्यांना स्वत:लाच आॅनलाइन औषधाची खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार याचिकाकर्तीने डॉक्टरांची बनावट प्रिस्क्रिप्शन बनवून आॅनलाइन औषध खरेदी केल्याची माहिती अ‍ॅड. वल्लरी यांनी खंडपीठाला दिली. कुरियर सर्व्हिसद्वारे औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येतात, अशी माहिती पाटील यांनी दिल्यावर खंडपीठाने चलन आणि अमली पदार्थ कुरियरद्वारे पाठवण्यास बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे शेड्युल ‘एच’ मधील औषधेही कुरियरद्वारे पाठवण्यास बंदी घालावी, अशी सूचना केली.