Join us

उघड्यावर कचरा जाळणे थांबेल का? माहीम- धारावी पाइपलाइनच्या बाजूलाच घडतोय प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 9:48 AM

लोकसहभाग कमी असल्याने पालिकेला प्रभावी कारवाई करण्यात अडथळा निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई महापालिका जंग जंग पछाडत आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे, मात्र, सर्वसामान्यांना प्रदूषणाचे काही पडल्याचे दिसत नाही. बिनदिक्कतपणे  कचरा  जाळण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. 

लोकसहभाग कमी असल्याने पालिकेला प्रभावी कारवाई करण्यात अडथळा निर्माण होत आहे. आजही अनेक ठिकाणी वाट्टेल त्या ठिकाणी कचरा जाळला  जात आहे. माहीम-धारावी पाइपलाइन येथे रस्त्याच्या कडेलाच मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जात असल्याचे निदर्शनास आले. या कचऱ्यातून प्रचंड धूर निर्माण  झाल्याने वाहन चालकांना त्रास जाणवत होता. 

कचरा जाळणे घातक कचरा हा विविध स्वरूपाचा असतो. त्यात विविध घटक असतात. त्यामुळे अशा प्रकारचा कचरा उघड्यावर जाळल्यास त्यातून निघणारा धूळ हा घातक ठरतो. शिवाय, असा कचरा जाळल्याने दुर्गंधीही पसरते. त्यामुळे कचरा जाळण्यावर निर्बंध आहेत.  कचरा जाळला जात असल्यास या क्रमांकावर करा तक्रार : ८१६९६८१६९७

 पालिकेच्या आपत्कालीन विभागाने उपलब्ध  करून दिलेल्या क्रमांकावर नागरिकांना तक्रार करता येते. डेब्रिज टाकणे, कचरा टाकणे, कचरा जाळणे अशा स्वरूपाच्या तक्रारी या क्रमांकावर येत असतात. त्यानुसार पालिका कार्यवाही करते. मात्र, कचरा जाळून पोबारा केला जात असल्याने त्यांचा शोध लागत नाही.