मुंबई : आॅनलाइन एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यंदाही पर्सेंटाइल पद्धती कायम ठेवत पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांच्या स्वतंत्र परीक्षा घेण्याचे सीईटी सेलच्या विचाराधीन आहे. प्रवेश नियमन प्राधिकरण आणि सीईटी सेलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या १ आॅक्टोबरला होणाऱ्या बैठकीत हा विषय प्राधिकरणापुढे मांडून विद्यार्थ्यांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. नोव्हेंबर अखेर सीईटी परीक्षेसंबंधी अंतिम वेळापत्रक आणि परीक्षेसंबंधी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.याआधी जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या परीक्षा पीसीएमबी गटातून परीक्षा देता येत होत्या. मात्र विद्यार्थ्यांना तीन गटांत, विविध शिफ्टमध्ये द्याव्या लागलेल्या परीक्षांमुळे हा गोंधळ निर्माण झाला. उच्च न्यायालयामध्ये हा विषय गेल्यानंतर तेथेही जर विद्यार्थी नीट आणि जेईई अशा दोन परीक्षा देऊ शकतात, तर त्याच धर्तीवर या दोन गटांसाठी स्वतंत्र परीक्षा देऊ शकत असल्याचे मत व्यक्त केले गेले असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली. त्यामुळे हा गोंधळ कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पीसीबी व पीसीएम या दोन स्वतंत्र परीक्षा वेगळ्या दिवशी द्याव्यात, असा पर्याय देण्याचा विचार गुरुवारी झालेल्या बैठकीत चर्चेला आला. या दोन्ही गटांचा निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.>‘पर्सेंटाइल पद्धतीत घोळ नाही’सीईटी सेलने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल मागील वर्षीपासून जेईई मेन्सच्या धर्तीवर पर्सेंटाइल पद्धतीत जाहीर केला. मात्र अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीचा फटका बसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी सीईटी सेल आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे केल्या. काही विद्यार्थ्यांनी यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर पर्सेंटाइल पद्धतीत घोळ नसल्याचे सिद्ध झाल्याची माहिती रायते यांनी दिली.मागील वर्षी पीसीएम, पीसीबी, पीसीएमबी या तिन्ही गटांच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी विविध शिफ्टमध्ये दिल्या आणि मग पर्सेंटाइल पद्धतीने त्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या टक्केवारीमध्ये घसरण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.ंदोन्ही विषयांच्या परीक्षा वेगवेगळ्या घेण्याबाबत प्राथमिक चर्चा बैठकीत झाली आहे, अद्याप अंतिम निर्णय नाही. विद्यार्थ्यांचा या बाबतीतील कल समजून घेतला जाईल. त्यांच्या सूचना, हरकतींचे मूल्यमापन करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती त्याचे अवलोकन करेल आणि मगच याबाबतीतील निर्णय घेण्यात येईल.- आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल
पीसीएम आणि पीसीबीच्या स्वतंत्र परीक्षा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:20 AM