गजबजलेल्या मुंबईत चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळेल का ?
By अोंकार करंबेळकर | Published: October 5, 2017 03:21 PM2017-10-05T15:21:02+5:302017-10-05T15:21:35+5:30
परळ- एलफिन्स्टन या स्थानकांना जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्यावर मुंबईतील वाहतूक, कोंडी व चालणा-यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील पदपथांवर चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळण्याची गरज आहे, असो मत तज्ज्ञांनी नेहमीच व्यक्त केले आहे.
मुंबई- परळ- एलफिन्स्टन या स्थानकांना जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्यावर मुंबईतील वाहतूक, कोंडी व चालणा-यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील पदपथांवर चालणा-या व्यक्तींना प्राधान्य मिळण्याची गरज आहे, असो मत तज्ज्ञांनी नेहमीच व्यक्त केले आहे. आता नियोजनामध्येही हा विचार गांभीर्याने करण्याची गरज माध्यमे आणि समाजमाध्यमांत व्यक्त होत आहे. परळ, एलफिन्सटन, करी रोड, दादर येथील रस्ते, सिग्नलच्या जवळचे भाग दिवसातील कोणत्याही वेळी गर्दीने भरलेले दिसून येत आहेत त्यावर टप्प्याटप्प्याने उत्तरे शोधता येतील. त्यामध्ये आता किमान चालणा-या लोकांना तरी जागा निर्माण करता येऊ शकते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे पदपथ हे ज्या चालणा-या व्यक्तींसाठी तयार केलेले आहेत त्यांना वापरायला मिळायला हवेत. परळ-वरळी या ऑफिस डिस्ट्रिक्टमध्ये मात्र बहुतांश पदपथांवर अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीवाले तसेच दुकाने आणि हॉटेल्सनी एक्स्टेंशन म्हणून पदपथांचा वापर केल्यावर चालणा-या लोकांना रस्त्यांवर उतरुन जावे लागते. यामुळे लोकांना अकारण धोक्याला सामोरे जावे लागते. तसेच आधीच अरुंद असणा-या रस्त्यांवर दोन्ही बाजूस चालणारे लोक उतरले की वाहतूक कोंडी आणखी वाढत जाते. बहुतांश प्रगत व आता प्रगतीशील देशांमध्ये चालणार्या लोकांना प्रथम प्राधान्य दिले जाते, त्यानंतर सायकल व शेवटी गाड्यांना असा क्रम ठरवलेला असतो. भारतातील अनेक महत्त्वाच्या शहरात आणि मुंबईत हा क्रम बरोबर उलट असल्याचे दिसून येते. स्थानकांच्या जवळच्या प्रदेशातील कोंडी अतिक्रमण व फेरीवालामुक्तीने साधता येऊ शकेल. परदेशात लोकसंख्या कमी आहे म्हणून त्यांना हे सगळं जमतं असे म्हणून आपण जे सहजशक्य उपाय करता येऊ शकतात त्यांच्याकडेही दुर्लक्ष करत आहोत.
पायी जाणारी व्यक्ती दिसली की गाडीला थांबावेच लागते - राजन रामा, सेंट ज्युलियन डॉटमन, मॉरिशस
मॉरिशसमध्ये नियोजनामध्ये पहिला अधिकार चालणार्या लोकांना देण्यात आला आहे. सर्व रस्त्यांवर पदपथ असून पायी जाणार्यांसाठी ते पुरेसे आहेत. जेथे रस्ता ओलांडावा लागतो तेथे पायी जाणार्यांना प्रथम प्राधान्य असते. अशी व्यक्ती दिसली केवळ गाडी थांबवणे अपेक्षितच नाही तर ते बंधनकारक आहे. जेथे गर्दीच्या ठिकाणी रस्ता ओलांडणे अशक्य वाटते तेथे स्काय वॉक किंवा सब वे ची योजना केलेली असते. लोक आवर्जून त्याचा वापर करतात.
कॅनडा, इंग्लंड, इस्रायल सर्वत्र चालणा-यांना प्राधान्य - अपर्णा लळिंगकर, नॉर्दर्न ओंटारिओ, कॅनडा
कॅनडामधे मोठ्या शहरांत जसे टोरांटोमध्ये टीटीसी (टोरंटो ट्रान्झीट सर्व्हीस) म्हणून प्रकार आहे त्यात स्ट्रीट कार, सब वे, बसेस हे सगळं समाविष्ट आहे. टोरंटोसारख्या शहरांत गरजेचं असेल तरच लोक चारचाकी गाड्या वापरतात. रेग्युलर ऑफिस कम्युटींगसाठी अधिकाधिक लोक टीटीसीच वापरतात. पण कॅनडामधे उत्तरेकडे सार्वजनिक वाहतूक फारशी चांगली नाही. त्याचं कारण तेथील अत्यंत कमी लोकसंख्या. त्यामुळे अधिकाधिक लोकांकडे चारचाकी गाड्या असतात. वरील तिनही ठिकाणी पादचारी चालू शकतात. पण भारतात ते अशक्य आहे. पदपथांवर एकतर फेरीवाले बसलेले असतात किंवा टु व्हीलर्स, सायकलस्वार सर्रास पदपथांवर येत असतात. त्यामुळे पादचार्यांना पदपथावरून चालणं अशक्य आहे. भारतात सिग्नल असताना देखील रस्ता ओलांडणं मुश्कील असतं. या तीनही ठिकाणी "पादचारी आपल्या गरजे नुसार बटण दाबून" रस्ता क्रॉस करण्यासाठीचा सिग्नल मिळवू शकतात. इस्राएलमधे कार्स प्रचंड प्रमाणात आहेत आणि देश छोटा. त्यामुळे तिथे हायवेवर वाहनांची रीघ लागलेली असते आणि ट्रॅफिक कायमच जॅम असतो. तरीही बेशिस्त नसते. लंडनमधे ट्युबच्या प्लॅटफॉर्म्सवर आणि सबवे मधे मी मुंबईसारखी प्रचंड गर्दी पाहिलेली आहे. पण चेंगराचेंगरी होत नाही. कारण लोक दुसर्याला प्राधान्य देऊन जात असतात. कॅनडामधे तर मी कधी धक्काबुक्की हा प्रकार अनुभवलेला नाही. खरं सांगू का परदेशात लोकांमध्ये रस्त्यावरून चालायचे कसे, गाड्या कशा चालवायच्या, वाहतुकीचे नियम पाळणे, समाजात वावरताना कसे वागणे, एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर कसे वागावे याचे ज्ञान खूप आहे. आपल्याकडे लोक मुद्दाम आरडाओरडा आणि विचित्र आवाजात ओरडायला सुरूवात करतात. ढकला-ढकली तर त्याच्या पुढची पायरी. केवळ विचित्र आवाज करून जमावात घबराट पसरवण्याकडेच अनेक विघ्नसंतोषी लोकांचा भर असतो. हे मी भारतात असताना गर्दीच्या ठिकाणी कायम अनुभवते. मुंबईत तर गर्दीच्या वेळेस अशाप्रकारे विचित्र ओरडणार्यांचे प्रमाण प्रचंड आहे. यात अशा लोकांना प्रचंड मजा वाटत असते.