दिवसागणिक स्वास्थ्य धोक्यात, लोकप्रतिनिधी आश्वासने पाळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 03:10 AM2018-10-05T03:10:38+5:302018-10-05T03:11:13+5:30
माहुलवासीयांचे लक्ष : स्थानिक आमदाराला पत्र लिहून मांडल्या समस्या, स्वास्थ्य दिवसागणिक धोक्यात
मुंबई : मुंबईच्या वेळवेगळ्या भागांतून विस्थापित केलेले रहिवासी माहुल येथे पुनर्वसित करण्यात आले आहेत. माहुलमध्ये प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने माहुलवासीयांचे स्वास्थ्य दिवसागणिक धोक्यात येत आहे. सर्व रहिवाशांनी ते पूर्वी राहत असलेल्या विभागातील आमदारांना पत्र लिहून मागण्या मांडल्या आहेत. मात्र आमदारांकडून शब्द मिळत नसल्याने रहिवाशांनी पुनर्वसनाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकार काय करीत आहे, हा जाब विचारण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या आंदोलनानंतर लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांना आश्वासने दिली असून, आता लोकप्रतिनिधींची आश्वासने पूर्ण होतात का? याकडे माहुलवासीयांचे लक्ष लागले आहे.
पर्यावरणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आंबा, काजू, फणस, कोकम, सुपारी, नारळ, उत्कृष्ट शेती आणि समुद्र असे माहुल होते़ नंतर येथे रिफायनरी आली आणि माहुलचा निर्सग हरपला़ माहुलचे मूळचे शेतकरी, मच्छीमार आणि त्यांची गावे उद्ध्वस्त झाली, हे सरकारने लक्षात घ्यावे. माहुल येथे काळी पडलेली खाडी, निर्जीव समुद्र आणि जळालेली खारफुटी हे वास्तव बघावे. माहुलचे मूळ रहिवासी आणि नंतर तेथे आणलेले प्रकल्पबाधित नरकयातना भोगत आहेत. या भागांत विविध आजारांचे थैमान तर आहेच, पण स्त्रियांना महिन्यातून तीन वेळा मासिक पाळी येण्यासारख्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. रिफायनरी आणि तिच्या संलग्न रासायनिक उद्योगांमुळे, शहरीकरणामुळे मूळ गावांची संस्कृती संपलेली आहे. त्यांना मासे पकडण्यासाठी आता पार रत्नागिरीपर्यंत म्हणजे प्रस्तावित नाणार रिफायनरीच्या परिसरापर्यंत जावे लागते.
मुंबईतील प्रकल्पबाधितांचे माहुलमध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करण्यात आलेल्या परिसरात सेवा-सुविधा नाहीत. माहुल परिसराला प्रदूषणाने घेरले आहे. परिणामी, प्रकल्पबाधितांना आरोग्याच्या समस्यांनी ग्रासले. या कारणास्तव प्रकल्पबाधितांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. या मागणीसाठी आंदोलनेही छेडण्यात आली आहेत. माहुल नको, आता दुसरीकडे स्थलांतरित करा, अशी रहिवाशांची प्रमुख मागणी आहे.
पाण्यामुळे आजारांचा विळखा
बऱ्याचदा अशा परिसरात पुरवठा करण्यात येणाºया पाण्यात प्रदूषणमिश्रित घटक आढळून येतात. त्यामुळे दूषित पाण्याच्या सेवनामुळे स्वास्थ्यावर त्वरित परिणाम होतात. त्यात डायरिया, गॅस्ट्रो, अपचन, उलट्या या आजारांचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा परिसरात राहणाºया व्यक्तींनी पाणी उकळून प्यावे. त्याचप्रमाणे गर्भवती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची अशा स्थितीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. कौशिक श्रीवास्तव, फिजिशिअन
त्वचाविकारांचा धोका
बºयाचदा रिफायनरीमुळे होणाºया प्रदूषणामुळे त्वचाविकारांचा धोका संभवतो. या परिसरातील हवेत सर्वाधिक प्रदूषणाचे घटक आढळतात. या हवेतील घटकांमुळे त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा कोरडी होणे, खाज येणे, लाल होणे अशा प्राथमिक स्वरूपाच्या तक्रारी उद्भवतात. या त्वचाविकारांवर वेळीच उपचार न केल्यास त्यांतून गंभीर आजार उद्भवू शकतात. शिवाय, लहानग्यांना याचा त्रास लवकर होतो.
- डॉ. सोनल खत्री, त्वचाविकारतज्ज्ञ
प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे
प्रदूषण असणाºया परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत. त्यात हवेतील धुळीकण रोखण्यासाठी मास्क वापरणे, पाणी उकळून पिणे, उघड्यावरील पदार्थांचे सेवन टाळणे, हातापायांची स्वच्छता अशा छोट्या-छोट्या गोष्टी अवलंबिल्याने आजार नियंत्रित ठेवता येतील. शिवाय, या परिसरातील नागरिकांनी २-३ महिन्यांतून एकदा आरोग्य तपासणीही करणे गरजेचे आहे.
- डॉ. मुकेश त्यागी, कान-नाक-घसातज्ज्ञ
काय आहेत लोकप्रतिनिधींची आश्वासने...
राम कदम : मी तुमच्याबरोबर उपोषणालासुद्धा बसेन आणि तुम्ही म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर येईन.
नसीम खान : तुम्ही मला सुनावणीनंतर भेटा, मी तुमची सर्व प्रकारे मदत करायला तयार आहे.
रमेश लटके : तुम्ही सर्व आमदारांची बैठक बोलवा. मग चर्चा करून आम्ही सर्व मिळून तुमची मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवतो व पूर्ण करतो.
पराग आळवणी : मी तुम्हाला जी लागेल ती मदत करायला तयार आहे. मी तुमच्याबरोबर न्यायालयात येतो आणि नंतर पुढे काय करायचे ते तुमच्यासाठी करतो.
तृप्ती सावंत : मी तुमच्यासाठी स्वत: सर्व आमदारांना फोन करून बैठक करते. सर्वांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाते. तुमच्या समस्येवर तोडगा काढते.
प्रकाश मेहता : मी स्वत: तुमच्या सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला लागेल ती मदत कोणत्याही वेळी करायला तयार आहे.
संजय पोतनीस : मी तुमच्यासाठी महानगरपालिका आयुक्तांकडे बोलणी करतो.