रस्त्यावर पार्क केलेली गाडी उचलून नेणार; नेमके रस्ते ठरविणार, पालिका तैनात करणार मार्शल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:33 AM2023-12-08T11:33:46+5:302023-12-08T11:33:58+5:30

रस्त्यांच्या कडेला अवैधरीत्या वाहने उभी केली जातात. त्यामुळे  वाहतुकीला अडथळा  निर्माण होतो. शिवाय  कचऱ्याची देखील समस्या निर्माण होते.

will pick up a car parked on the street; The exact roads will be determined, the municipality will deploy marshals | रस्त्यावर पार्क केलेली गाडी उचलून नेणार; नेमके रस्ते ठरविणार, पालिका तैनात करणार मार्शल

रस्त्यावर पार्क केलेली गाडी उचलून नेणार; नेमके रस्ते ठरविणार, पालिका तैनात करणार मार्शल

मुंबई : रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांची आता उचलबांगडी होणार आहे. ही  कारवाई वाहतूक पोलिस नाही,  तर मार्शल करणार आहेत. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विभाग स्तरावर मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मार्शलना सर्वाधिकार  दिले जातील. मात्र नेमक्या कोणत्या रस्त्यांवरील वाहनांवर कारवाई होणार याविषयी अजून काही स्पष्टता नाही. मार्शलची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, त्यात नेमक्या रस्त्यांबाबत सूचना केल्या जातील, अशी कार्यपद्धती असल्याचे समजते.

रस्त्यांच्या कडेला अवैधरीत्या वाहने उभी केली जातात. त्यामुळे  वाहतुकीला अडथळा  निर्माण होतो. शिवाय  कचऱ्याची देखील समस्या निर्माण होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील अवैध पार्किंगच्या  समस्येची  दखल घेतली आहे. ठरवलेले वाहनतळ सोडून अन्यत्र कोठेही वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचीदेखील गैरसोय होते. चालणेही दुरापास्त होते आणि वाहनांच्या आजूबाजूला कचरा निर्माण होतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी विभाग स्तरावर मार्शल्सची नेमणूक करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार, विभाग पातळीवर मार्शल्सची नेमणूक करण्यात येईल, असेही पालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी सांगितले.

 बहुसंख्य रस्त्यावर पार्किंग  
महामार्ग किंवा मुख्य रस्त्यांवर, तसेच विशिष्ट ठिकाणी पार्किंगची सुविधा वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने पार्क केल्यास कारवाई होते. मात्र शहर तसेच उपनगराच्या अंतर्गत भागात सोसायट्यांमध्ये पार्किंगची वानवा आहे. त्यामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांवर असंख्य वाहने पार्क केलेली असतात. या वाहनांवरही कारवाई होणार का, हा मुद्दा सध्या तरी अनुत्तरित आहे.  या ठिकाणीही कारवाई झाल्यास स्थानिक आणि मार्शल यांच्यात संघर्ष उडण्याची भीती आहे. अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांवर मार्शल दंड आकारणार की वाहन ताब्यात घेणार, हे काही दिवसात  स्पष्ट होईल.

Web Title: will pick up a car parked on the street; The exact roads will be determined, the municipality will deploy marshals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.