प्लाझ्मा थेरपी ठरेल रामबाण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:24 PM2020-04-25T17:24:17+5:302020-04-25T17:24:57+5:30
जगभरात चाचणी सुरू ; महाराष्ट्रातील डाँक्टर आणि संशोधकही सज्ज
मुंबई - १९१८ – १९ मध्ये फ्लूच्या साथीने १ कोटी ८० लाख भारतीयांसह जगभरातील ५ कोटी रुग्णांचा बळी घेतला होता. त्या वेळी प्लाझ्मा थेरपीमुळे ही साथ नियंत्रणात आली होती असा दावा जगातील काही संशोधकांकडून केला जात आहे. आता हीच थेरपी कोरोनावरही ‘रामबाण’ इलाज ठरेल का, याची चाचपणी जगभरात सुरू झाली आहे. भारतातील डाँक्टर आणि संशोधकही या चाचण्यांसाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र सरकारलाही त्यासाठी परवानगी मिळाली आहे. पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासह दिल्ली, जयपूर, सुरत, तिरूअनंतपूरम इथे चाचण्या सुरू होत आहेत. तर, जर्मनी, अमेरीका, चीन यांसारख्या अनेक देशातून सकारात्मक बातम्या येत आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तर कोरोना विरुध्दच्या लढाईतील मोठे ‘अस्त्र’ हाती लागणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी लस निर्मितीसाठी जगभरात युध्दपातळीवर संशोधन सुरू असले तरी ती लस आणखी काही महिने तरी दृष्टिपथात नाही. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेच्या चाचण्या जागतिक आरोग्य संघटनेसह विविध देशामध्ये सुरू झाल्या आहेत. प्लाझ्मा ही नवीन थेरपी नाही. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यावर संशोधन सुरू होते. या थेरपीचा शोध लावणारे जर्मनीचे डाँक्टर वाँर्न डेनींग यांना १९०१ साली नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला होता. विशेष म्हणजे मेडिकल क्षेत्रासाठी दिलेले ते पहिले नोबेल होते. ही थेरपी स्पॅनीश फ्लू, इबोला यांच्यारख्या साथीच्या आजारांमध्ये परिणामकारक ठरली होती.
कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा देऊन त्यांच्या प्रतिकार शक्तीत सुधारणा करणे असे या थेरपीचे ढोबळ वर्णन करता येईल. प्लाझ्मामधिल रक्तपेशींमध्ये अॅण्टिबॉडीजदेखील (प्रतिजैवीक) असतात. त्या आजारास कारणीभूत ठरणा-या पेशींना प्रतिकार करून परतवून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश आले की पुन्हा तशाच रोगाचे आक्रमण झाले तर रक्तपेशी त्याला वेळीच प्रतिकार करतात. करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर करून करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी इंडियन कौन्सिल आँफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) , ड्रग कंट्रोलर जनरल आँफ इंडिया (डीजीसीआय) काही नियम तयार केले आहेत. पुणे, सुरत, जयपूर आणि तिरूअनंतपूरम या शहरांमधिल वैद्यकीय महाविद्यालयांना त्या नियमावलीच्या आधारे या थेअरीच्या चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक पूर्व तयारी झाली असून आयसीएमआरने ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर निवडक रूग्णांवर उपचार सुरू केले जातील.
कोरोनामुक्त झालेल्या आणि १४ दिवस विलगिकरणात असलेल्या व्यक्तीला जर कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसतील तर त्याचे रक्त या थेरपीच्या चाचणीसाठी घेतले जाणार आहे. तत्पूर्वी त्या दात्याच्या तीन स्वँब टेस्ट निगेटीव्ह याव्या लागतील. तसेच, त्या रक्तात करोनाला प्रतिकार करणा-या अँण्टी बाँडीसुध्दा असाव्या लागतील. या थेरपीच्या चाचण्या ज्या रुग्णांवर केल्या जातील त्यांना उपचार पध्दतीबाबत पूर्व कल्पना दिली जाणार आहे. तसेच, त्यांचा वीमासुध्दा काढला जाईल. सर्वसाधारण नव्हे तर गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवरच या चाचण्या केल्या जातील. या थेरपीचा वापर सध्या ‘क्लिनिकल ट्रायल’ स्वरुपातच होणार आहे. विशिष्ट लक्षणे असल्या दोन रुग्णांपैकी एकावर ही थेरपी आणि दुस-यावर अन्य पद्धतीने उपचार केले जातील. त्यातून ही थेअरी किती यशस्वी ठरते याचे निष्कर्ष मांडले जातील. त्यानंतरच याचा वापर किती, कसा आणि कोणत्या रुग्णांवर करायचा याबाबतची दिशा ठरवली जाणार आहे.
या थेरपीचे कोणत्या रुग्णांवर कसे परिणाम होतील याचा कोणताही अंदाज बांधता येत नाही. त्याशिवाय प्लाझ्मा देणारा आणि घेणारा यांचे वय, त्यांच्यातील आजाराची लक्षणे अन्य शारीरिक व्याधी यांचाही मेळ असणे आवश्यक असते. त्यामुळे सरसकट सर्व रुग्णांवर त्या पद्धतीने उपचार करता येणार नाहीत. परंतु, अशा थेरपीच्या चाचण्या घेतल्याशिवाय त्यांची परिणामकारकताही सुध्दा होणार नाही. त्यामुळे अत्यंत नियंत्रित पद्धतीने (कॉन्वालेसंट) आणि सर्वोत्तम व्यवस्थेत या चाचण्या करून त्याचे यश अपयश आपल्याला ठरवावे लागणार आहे.
- डाँ, ऋषिकेश वैद्य, इंटेसिव्हीस्ट, होरायझन हाँस्पिटल
यश येण्याची शक्यता जास्त
या आजारवर तूर्त कोणतेही रामबाण औषध नाही. हायड्रोक्लोरोक्वीन उपयुक्त ठरते असे काल परवापर्यंत सांगितले जात होते. मात्र, त्या गोळ्या उपयुक्त नसल्याचे आता अमेरिकेचे म्हणणे आहे. एचवनएनवन, सार्स, कॅन्सर, एड्स यांसारख्या आजारांवर मात करण्यासाठी वापरली जाणारी औषधे कोरोना रुग्णांना काही प्रमाणात दिली जातात. मात्र, त्यांच्या परिणामकारकतेचा ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यामुळे सध्या औषधोपचारांचे प्रयोगच सुरू आहेत असेच आपल्याला म्हणावे लागेल. फ्लू, टीबी यांसारख्या आजारांना ओळखणारी व्यवस्था आपल्या शरीरात असते. तशीच कोरोनाला ओळखणारा प्लाझ्मा जर बरे झालेल्या व्यक्तीकडून रुग्णाला उसनवारीने मिळाला तर त्यातून रोगावर मात करणे शक्य होईल. त्यामुळे हे प्रयत्न यशस्वी ठरतील अशी आशा आहे.
- डाँ. दिनकर देसाई, राष्ट्रीय अध्यक्ष, पँथलाँजीस्ट असोसिएशन