Uday Samant : कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होणार - उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 07:54 PM2021-03-24T19:54:14+5:302021-03-24T19:56:25+5:30
Uday Samant : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या भागात सुरू होत असल्याचा कोकणवासीयांना आनंद झाल्याची भावना उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबई : रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार असून कोकणातून दर्जात्मक अभियंते तयार होतील असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रत्नागिरी येथे १५२.५३ कोटी रुपये खर्च करून ३०० प्रवेश क्षमतेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅट्रानिक्स इंजिनिअरिंग, सिव्हिल व इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजेंन्स व डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी व मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच समकालीन स्पर्धात्मक काळाशी अनुरूप असे अभ्यासक्रम यामध्ये असल्याकारणाने विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांना न्याय देता येणार आहे, असे उदय सामंत म्हणाले.
याचबरोबर, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. विशेषतः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या भागात सुरू होत असल्याचा कोकणवासीयांना आनंद झाल्याची भावना उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.