प्रदूषण, कचऱ्यापासून समुद्राचे संरक्षण करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:27 AM2023-05-22T09:27:08+5:302023-05-22T09:27:16+5:30

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; राज्यपालांच्या उपस्थितीत जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

Will protect the sea from pollution, garbage! | प्रदूषण, कचऱ्यापासून समुद्राचे संरक्षण करणार!

प्रदूषण, कचऱ्यापासून समुद्राचे संरक्षण करणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातील एक मिनिट वेळ दिला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि ऱ्हास कमी होईल. स्वच्छ समुद्रकिनारे हे आपल्यासाठी वरदान असून, हे किनारे कायम प्रदूषण व कचऱ्यापासून मुक्त ठेवून समुद्राचे संरक्षण करण्यासाठी शपथबद्ध होऊयात,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्रकिनारा स्वच्छता’ मोहिमेने रविवारी सुरुवात झाली.

जी - २० परिषदेच्या निमित्ताने राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू चौपाटी येथे समुद्राचा किनारा स्वच्छ ठेवण्याची शपथ उपस्थितांना दिली. जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री स्वत: या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भुपेंद्र यादव हे मोहिमेनिमित्त उपस्थित होते. 

आयुष्यातील प्रत्येक कार्य पर्यावरणपूरक असावे, असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून पोहोचावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाने जनआंदोलनाचे रूप घेतले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले असून, त्यासाठी पावले उचलली आहेत. यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी उपस्थित होते.

किनारा स्वच्छ आहे ना?            
जुहू बीच येथे आयोजित ‘जी-२० मेगा बीच क्लीन अप’ मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीचवर येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. बीच स्वच्छ आहे ना? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला असता, ‘होय, आम्ही रोज या ठिकाणी येत असतो’, असा प्रतिसाद नागरिकांनी दिला. तुमच्या काही सूचना असतील तर त्या नक्की कळवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Web Title: Will protect the sea from pollution, garbage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.