Join us

सार्वजनिक वाहतूक सक्षम होणार का? मुंबईकरांचा जाहीरनामा; सरकारी दवाखाने वाढवण्याची आवश्यकता 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 12:44 PM

अर्बन केअर सेंटर हे शहर नियोजनाच्या दृष्टीने काम करते. मुंबईतील २२ वॉर्डांतील दोन हजार लोकांशी बोलून त्यांनी मुंबईसाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, याचा लेखाजोखा मांडला आहे.

मुंबई : सार्वजनिक वाहतूक सुधारणा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, वाजवी दरातील घरे, उच्च शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता यांना प्राधान्य देणारा राजकीय पक्षांचा जाहीरनामा हवा, अशी आग्रही मागणी ‘अर्बन केअर सेंटर’ने या निवडणुकीच्या निमित्ताने केली आहे.  अर्बन केअर सेंटर हे शहर नियोजनाच्या दृष्टीने काम करते. मुंबईतील २२ वॉर्डांतील दोन हजार लोकांशी बोलून त्यांनी मुंबईसाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, याचा लेखाजोखा मांडला आहे. मुंबईसाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्याची अपेक्षा करताना या क्षेत्रात नेमके काय केले पाहिजे, याचे विश्लेषणही यात केले आहे. 

बसची संख्या वाढवणे गरजेचे मेट्रोने मुंबईकर प्रवास करत असले तरी अनेकांना मेट्रोचे तिकीट परवडत नाही. अशा लोकांना बसचा आधार असतो. मात्र सध्या बसची संख्या खूपच कमी झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बसची संख्या वाढवणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.  आरोग्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर, नवनवे आजार डोके वर काढू लागले आहेत. काही वेळेस तर रुग्णाला थेट रुग्णालयात दाखल करावे लागते. सार्वजनिक दवाखाना हा प्रकारच कमी होऊ लागला आहे. खासगी डॉक्टरांची संख्या वाढली असून, त्यांचे शुल्क सामान्यांना परवडत नाही. त्यामुळे आरोग्य सेवा किफायतशीर असावी, असे सेंटरचे प्रिन्सिपल डायरेक्टर पंकज जोशी म्हणाले. 

उच्च शिक्षण, स्वच्छतेचे काय?मुंबईत उच्च शिक्षणासाठी बाहेरून विद्यार्थी येतात. मात्र, या शिक्षणासाठी भरमसाठ पैसे लागतात. सर्वांना ते शक्य होता नाही. त्यामुळे अनेकांची संधी हुकते. त्यामुळे उच्च शिक्षण अगदी सामान्यांनाही परवडेल, असे असावे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता याकडेही लक्ष दिले पाहिजे. मुंबईत १०० माणसांमागे एक शौचालय अशी स्थिती आहे. तेथे अस्वच्छता असते. पुरेशी शौचालये बांधली पाहिजेत. कोरोना काळात किंवा अन्य साथीच्या आजाराच्या वेळी मोठ्या प्रमाणावर  स्वच्छतागृहांची आवश्यकता का हवी आहे, हे अधोरेखित झाले आहे. मोकळ्या जागा हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी जिमखाने, क्लब हाउस येथे मोकळ्या जागा असतात. मात्र सगळ्यांनाच तेथे प्रवेश नसतो. सामान्यांना उपलब्ध होतील, अशा हिरव्यागार मोकळ्या जागा राखल्या गेल्या पाहिजेत. 

मुंबईत आज लोकांना घर घेणे परवडत नाही. एक कोटीच्यावर घरांच्या किमती असतात. थ्री बीएचकेसारखी महागडी घरे घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. त्यामुळे मूठभर लोकांसाठी घर बांधणी न करता वन बीएचकेसारखी परवडणारी घरे उपलब्ध झाल्यास लोकांना दिलासा मिळेल.-पंकज जोशी, प्रिन्सिपल डायरेक्टर, अर्बन केअर सेंटर

टॅग्स :मुंबई